मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत पी. वरवरा राव आणि शोमा सेन यांनी कोरोना पार्श्वभूमीवर केलेला जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने मंगळवारी नामंजूर केला. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सामील असल्याचा आरोप या दोघांसह या प्रकरणातील इतर आरोपींवर ठेवण्यात आलेला आहे.


कोरोना विषाणूमुळे कोविड 19 सध्या राज्यभरात फैलावत आहे. त्यावर अद्यापही काही इलाज सापडलेला नाही. अशा परिस्थितीत वरवरा राव वय 80 आणि शोमा सेन वय 61 यांनी कोरोनाचा संसर्ग आणि प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणांमुळे आपल्याला तात्पुरता जामीन द्यावा, अशी मागणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाकडे केली होती.


वरवरा राव यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं की, रक्तदाबसह अनेक आजार असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जामीन द्यावा, असं त्यांनी आपल्या अर्जात स्पष्ट केलं होतं. यापूर्वीही त्यांनी ते सध्या असलेल्या तळोजा कारागृहातही स्वतंत्र कोठडीत ठेवण्यासाठी जेल अधिक्षकांना पत्र दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही, असेही त्यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.


तर शोमा सेन यांनीही आपल्या अर्जात म्हटलंय की, त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनामुळे कोविड 19 हा आजार वेगानं होतो आणि त्यावर इलाजही नाही, त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी सेन यांच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती. सेन या सध्या भायखळा कारागृहात आहेत. तपास यंत्रणेच्यावतीने जामीनाला जोरदार विरोध करण्यात आला. त्यानंतर विशेष न्यायालयाने हे दोन्ही अर्ज नामंजूर केले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपींनी घरच्यांशी फोनवर बोलण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. कोरोनामुळे घरच्यांची काळजी लागली आहे, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे.


Coronavirus | फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा : सर्वोच्च न्यायालय




संबंधित बातम्या :