मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हा आलाच. पण यावेळी संमेलन कुठं घ्यायचं यावरून वादाला सुरुवात झाली होती. संमेलन नाशिकला घ्यायचं की दिल्लीला असा हा वाद होता. याचा सस्पेन्स आता संपला असून यावर्षी संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. मात्र, आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी साहित्य संमेलन भरवण्यासाठी असमर्थता दर्शवली. पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचं कळवलं असल्याचं ठाले पाटील म्हणाले. त्यामुळेच नाशिकमध्ये यावर्षीचं साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचं आयोजकत्व देण्यात आलं असल्याची माहिती ठाले-पाटील यांनी दिली आहे.
सरहद संस्थेकडून प्रतिवाद..
आज साहित्य संमेलन नाशिकला होणार हे जाहीर झाल्यावर पुण्याची सरहद संस्था आणि दिल्लीचे आयोजक अविनाश चोरडिया यांनी संयुक्त निवेदन जारी करुन कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रेसनोट तसंच पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा प्रतिवाद केला आहे.
94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळाने कुसुमाग्रज आणि वसंत कानटकर यांच्यासारखे थोर लेखक तसेच स्वातंत्र्यवीर सावकर, तात्या टोपे, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यापासून शाहीर वामनदादा कर्डक यांची भूमि असलेल्या नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेतला याचे आम्ही स्वागत करतो. नाशिक किंवा दिल्ली हा वाद कधीच नव्हता. सन्माननीय कौतिकराव ठाले पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असा आरोप लावला आहे की सरहद संस्थेने दिल्लीमधील विशेष संमेलन घेण्याची संधी चुकवली. यावर आमचा आक्षेप आहे.
यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये; कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, दिल्लीची संधी हुकली
आमच्या संस्थेने यापूर्वी घुमान येथे यशस्वी संमेलन घेतले आहे. दिल्लीतही अनेक कार्यक्रम घेण्याचा अनुभव आहे. राहिले विशेष संमेलनाचे ज्याप्रमाणे सरहद संस्थेने लेखी प्रस्ताव दिला. त्याप्रमाणे ठाले पाटील यांनी कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. किंबहुना दिल्लीकरांची योग्यता नसल्याने दिल्लीला संमेलन घेतले जाणार नाही, अशी भूमिका जाहिरपणे मांडली. ज्या नेत्यांचे ठाणे पाटील यांनी सरहद संस्थेशी नाव जोडले त्या पंतप्रधान मोदी आणि गडकरी यांच्याबद्दल ठाले पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. ही खरे तर संयोजकाबद्दल केली असती तर जास्त उचीत ठरले असते, असे निवेदनात म्हणत संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.
संजय सोनवणी यांची फेसबुक पोस्ट लिहीत टीका
कौतिकराव ठाले पाटील, किमान खरे बोलायला तरी शिका. सरहद संस्थेने दिल्लीला साहित्य संमेलन घ्यायची मागणी गेल्या एक वर्षापासून लावून धरली आहे. त्यावर आपण आजवर कधी कोरोनाचे निमित्त देऊन संजय नहार मोदी-शहाचे हस्तक आहेत असा बिनडोक आरोप करून दिल्लीला टाळत टोलवाटोलवी करत राहिलात.
अगदी कालच म. टा. मध्ये दिलेल्या मुलाखतीतही तुम्ही धूर्त आणि मस्तवाल राजकारणी गावगुंडाप्रमाणे बेलगाम सुटला होतात. आणि आज मात्र "सरहद"ला आम्ही संधी दिली होती ती त्यांनीच घालवली अशा आशयाची प्रेसनोट व तीही साहित्य महामंडळाच्या लेटरहेडवर काढून पुन्हा नवी चाल खेळत सरहदच्या प्रामाणिक हेतूवर बेअक्कल तारे तोडून साहित्य महामंडळ आणि सरहदला हेतुपुरस्सर बदनाम केले आहे, अशी टीका संजय सोनवणी यांनी केली आहे.