मुंबई :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर आज रोहित पवार यांना आज, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने बारामती अॅग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. 


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस देत बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते.  यासाठी रोहित पवार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 72 तासांची मुदत देखील देण्यात आली होती. त्यानंतर आज हायकोर्टात रोहित पवार यांनी धाव घेतली. रोहित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  सुनावणी करताना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बारामती अॅग्रो कंपनीवर 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले आहेत. 


मुंबई हायकोर्टात बारामती ॲग्रो बाबत पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. 


ही सूडबुद्धीने कारवाई : रोहित पवार 


दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट करत कारवाईची माहिती दिली होती. सरकारविरोधात भूमिका घेत असल्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही. राज्यातील 2 ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या वाढदिवसा दिवशी मला जरी गिफ्ट दिल असलं तरी आगामी निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेच्या माध्यमातून त्यांना रिटर्न गिफ्ट मिळेल, असंही पवार यांनी म्हटले. 


रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राज्य सरकारवर टीका केली. राजकीय नाकेबंदी करता येत नाही म्हणून सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं विरोधकांनी म्हटले. 


शरद पवारांनी कारवाईवर काय भाष्य केलं?


शरद पवार हे आज बारामतीतील (Baramati) गोविंद बाग (Govind Baug) या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :