मुंबई : "आज शर्मिला वहिनींची भेट घेतली, त्यांनी माझं कौतुकही केलं. इमारतीच्या सचिवाने माफी मागावी अशी अपेक्षा होती आणि त्यांनी माफी मागितली," अशी प्रतिक्रिया तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांनी व्यक्त केली. मराठी असल्याने तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा नाकारल्याचा प्रकार मुलुंडमध्ये (Mulund) समोर आला होता. त्यानंतर त्या आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचल्या. इथे त्यांनी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


सेक्रेटरीला पदावरुन काढलंय : तृप्ती देवरुखकर


तृप्ती देवरुखकर म्हणाल्या की, "माझी एवढीच अपेक्षा होती की माफी मागावी आणि त्यांनी मागितली आहे. आज वहिनींची भेट घेतली. त्यांनी माझं कौतुकही केलं. मी बोलले म्हणून आता अनेक मुद्दे समोर येत आहेत. हे मुंबईत घडत आहे. त्या इमारतीमधील घरमालक जागा देण्यास तयार होते. पण त्या इमारतीच्या सेक्रेटरीने हा प्रकार केला होता आणि त्या गुजराती सेक्रेटरीने हा संपूर्ण गोष्ट घडवली. आता त्यांना त्या पदावरुन काढून टाकलं आहे." तसंच राज ठाकरे यांच्याशी बोलण झालं नाही, असं तृप्ती देवरुखकर यांनी सांगितलं. 


"राजसाहेबांच्या ट्वीटनंतर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार"


दरम्यान, या प्रकरणात मनसे पदाधिकारी सत्यवान दळवी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राज साहेबांच्या ट्वीटनंतर आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, "काल मनसैनिकांनी पाहिला. ज्यांनी विरोध केला त्यांच्यासमोर आम्ही गेलो आणि त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे. आता अनेक फोन कॉल येत आहेत आणि त्यांच्यासोबतही अशा गोष्टी घडत असल्याचं सांगत आहेत. आता राज साहेबांच्या ट्वीटनंतर आता आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार आहोत. 20 टक्के लोक असे करतात, 8 टक्के लोक चांगले आहेत. जैन समाजासाठी ही जागा आहे हे म्हणणं चुकीचं आहे आणि याबाबत शासनाने पाऊल उचललं पाहिजे. 


काय आहे नेमकं प्रकरण?


तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतलं. 


... तर गालावर वळ उठतील : राज ठाकरे


यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित," असा इशारा त्यांनी दिला. सोबतच सरकारने पण धाक दाखवला पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. तसंच "अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे," असं आवाहन त्यांनी मनसैनिकांना केलं आहे.


हेही वाचा