नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देताना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.  


नवाब मलिक हे फेब्रुवारी 2022 पासून म्हणजेच जवळपास दीड वर्षांपासून कारावासात होते. यापूर्वी हायकोर्टाने मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने कोणताही विरोध न करता, जामीन मंजूर केला. 


किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया


 नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी  आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केला नाही. 


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिकांवर आरोप आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’नं कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. 


 नवाब मलिक यांनी यापूर्वी वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मग हायकोर्टानेही जामीन नाकारला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला आहे.    


एक किडनी निकामी  


नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालीय आणि ते सध्या एकाच किडनीवर आहेत.मलिकांवर सध्या उपचार सुरु आहेत. नवाब मलिक हे सध्या कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली होती.


नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?


हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. या द्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या  सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे.