मुंबई: राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता राखी जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत तशी चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. 


शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ याच्यासह सुप्रिया सुळे या बैठकीला हजर आहेत. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच पेनड्राईव्ह प्रकरणात राष्ट्रवादी नेत्यांची नावं आल्यानं पुढील रणनीती काय असावी यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


पालकमंत्र्यांचा कार्यभारही दुसऱ्याकडे सोपवणार
राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या गोंदिया आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दुसऱ्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे. नवाब मलिक हे सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे. 


नवाब मलिकांवरील आरोप काय आहेत?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची तीन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.


संबंधित बातम्या: