Maharashtra Navnirman Sena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने पावती बुक बनवून फेरीवाल्यांकडून पैस उकळणाऱ्या दोन भामट्यांना मनसेने रंगेहात पकडले आहे. त्या भामट्यांकडे शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडलं असून मनसेने भामट्यांना समज देवून सोडून दिलं आहे. परंतु, या दोघांचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे शिवसेने स्पष्ट केले आहे.
मनसेच्या नावाने पावती बुक बनवून वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांचा भांडाफोड मनसेनं केला आहे. या दोघा भामट्यांना मनसेनं रंगेहात पकडून समज देवून सोडून दिलं आहे. 14 मार्च रोजी विरार पूर्वेच्या कारगील नगर येथील मार्केटमध्ये दोन भामटे मनसेच्या नावाने शिवजयंतीची वर्गणी घेत होते. त्यावेळी मार्केट मधील फेरीवाल्यांनी मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल जाधव यांना फोन करुन याबाबत माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी ताबडतोब मार्केटमध्ये येवून त्या दोघांना पकडले. चौकशी केली असता ते दोघेही मनसेचे पदाधिकारी नसल्याचे लक्षात आले. परंतु, त्या दोघांच्या हातात मनसेच्या नावाची शिवजयंतीचे पावती बुक होते. दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर ते नालासोपारातील राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे. पकडलेल्या दोघांपैकी एकाच्या खिशात शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडलं आहे.
दरम्यान, पावती फाडणारे आमचे कार्यकर्ते नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. ते दोघे जण मनसेच्या नावाने पैसे उकळत होते, तर मनसेनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. पोलिसांच्या चौकशीत ते दोघे जण नक्की कोण होते? हे स्पष्ट झालं असतं. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेची बदनामी केली जात असल्याचा आरोप विरारचे शिवसेना उपशहर प्रमुख उदय जाधव यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Mumbai : ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी
Holi: होळी आधीच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक
Maharashtra Tea Price: सर्वसामान्यांच्या खिशाला चटका; कटिंग चहा महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ