Kalyan Navratri 2022 : कल्याणमधील (Kalyan) महालक्ष्मी मंदिर हे सुमारे 300 वर्ष जुनं असं पेशवेकालीन मंदिर आहे. 1862 मधील ब्रिटीश गॅझेटरीमध्ये या महालक्ष्मी मंदिराची नोंद असल्याची सापडते. पेशवे वतनाकडून मंदिराच्या पूजाअर्चेसाठी 26 रुपये खर्च दिला जात होता. तोच आजही कल्याणच्या तहसीलदारामार्फत दिला जात आहे. शिवाजी चौकातून सरळ टिळक चौकाच्या पुढे दत्त आळीजवळ रस्त्याला लागूनच हे महालक्ष्मी मंदिर आहे. 


जुन्या काळातील दगडी आणि लाकडांचा वापर असलेले वाड्याचे बांधकाम अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 300 वर्षांपूर्वी लाकडाचा वापर करुन बांधकाम करण्यात आले होते. मात्र भक्तांची वाढती गर्दी आणि कमकुवत झालेले मंदिराचे बांधकाम यामुळे विश्वस्थांकडून या मंदिराचा 2017 साली जिर्णेाद्धार करण्यात आला. त्यावळी मंदिराचा पुरातन लूक तसाच कायम ठेवण्याचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न करण्यात आला. मंदिराच्या बांधकामातील काही दगड, लाकडी साहित्याचा वापर पुन्हा करण्यात आला. त्यामुळे मंदिर आजही पुरातनच दिसून येत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चौथऱ्यावर महालक्ष्मीची 2 ते 3 फुट उंच संगमरवरी मूर्तीच्या शेजारी पेशवेकालीन देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिराचा एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरात सर्व समाजातील घटकांना आरतीचा मान देण्यात आलेला आहे. 




365 दिवस समाजातील विविध घटकांकडून या ठिकाणी देवीची आरती करण्यात येते. नवरात्रीमध्ये या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. भक्तिभावानं येणारे भाविक आईची खणा नारळानं ओटी भरतात आणि मनोभावे पूजा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस या मंदिरात विविध अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे, सर्व कार्यक्रम महिलांकडूनच आयोजित करण्यात येतात. कल्याण लगत असलेले सर्वच गाव आणि शहरातील नागरिक अगदी न चुकता नवरात्रोत्सवात मोठ्या भक्ती भावानं देवीच्या दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे, कल्याणच्या माहेरवाशिनी आपल्या माहेर आल्यावर आई महालक्ष्मीच्या भेटीला येतात. माहेरवाशिणींना महालक्ष्मी आपल्या आई सारखीच आहे.


कल्याणमधील ज्येष्ठ गायनॉकॉलोजीस्ट आणि सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघना म्हैसकर या गेली 40 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असतानाच डॉक्टर म्हैसकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये देखील पुढाकार घेतला आहे. कल्याणमधील रोटरी क्लब किंवा इतर सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग असतो. डॉ. मेघना म्हैसकर यांच्या हस्ते आज कल्याणमधील महालक्ष्मी मंदिरात आरती करण्यात आली. त्यांच्यासोबत आरतीसाठी अॅड. अर्चना सबनीस, सामाजिक कार्यकर्ता दिप्ती दिवाडकर, प्राध्यापक वर्षा मेहतर, डॉ. सोनाली पाटील, अॅड. मनीषा गुंजाळ, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. इशा पानसरे, डॉ. लीना काटकर, सई वैद्य, साची कदम, अश्विनी गवळी उपस्थित होत्या. या सर्व महिला सामाजिक कार्यात देखील तितक्यात हिरारीनं सहभाग घेत असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :