मुंबई: एकीकडे देशभरासह राज्यात नवरात्रीची (Navratri 2022) धूम सुरु असतानाच त्याला गालबोटही लागण्याचे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गरबा (Dandiya) खेळत असताना आतापर्यंत हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) चारहून जास्त तरुणांचा मृत्यू झाला आहे. गरबा खेळताना आतापर्यंत देशातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये राज्यातील चार जणाचा समावेश असून मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे. 


नवरात्रीमध्ये तरुणाईचा उत्साह एकीकडे ओसांडून वाहत असताना दुसरीकडे मात्र या हृदयविकारामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील आनंद परिसरातील तारापूर या ठिकाणच्या 21 वर्षाच्या युवकाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गरबा खेळताना हा युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पम तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 


वाशिमधील कारंजा गावात गरबा खेळताना दोन दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. 30 सप्टेंबर मध्ये गोपाळ इन्नानी यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी 25 वर्षीय सुशील काळे यांचा मृत्यू झाला. 


मुंबईमध्ये मुलुंड परिसरात परिसरात 1 ऑक्टोबरच्या रात्री ऋषभ लहरी या युवकाचा मृत्यू झाला. गरबा खेळताना त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 


विरारमध्ये  मनीषकुमार जैन या युवकाचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने वडिलांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर बुलढाण्यामध्ये हॉटेल व्यावसायिक असलेल्या विशाल पडधरीया (47 वर्ष) यांचाही गरबा खेळताना मृत्यू झाल्याची घटना घडलीय.  


मुंबईमध्ये हृदयविकाराने मृत्यूंच्या संख्येत पाच पट वाढ 


मुंबईमध्ये हृदयविकाराने मृत्यूंच्या संख्येत पाच पट वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2020 साली 25 हजारांहून अधिक लोकांचा  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि व्यक्तींचा  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.