नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील आधुनिक शहरातील ड्रीम प्रकल्प म्हणून मेट्रोला पाहिले जात होते. मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या प्रकल्पामुळे शहराला चार चांद लागणार होते. मात्र दहा वर्ष होत आली तरी सिडकोने सुरू केलेल्या मेट्रो प्रकल्पाला पुर्णविराम लागलेला नाही. चार वेळा डेडलाईन घोषित करणाऱ्या सिडकोला तीन ठेकेदार बदलावे लागले. रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे दोन हजार कोटींचा प्रकल्प 3 हजार कोटींच्या वर गेल्याने तब्बल 1 हजार कोटींचा भूर्दंड सिडकोला लागला आहे. दुसरीकडे मेट्रोचे स्वप्न दाखवत सिडको आणि खाजगी बिल्डरांनी करोडोची घरे सर्वसामान्यांच्या गळ्यात मारली आहेत. मेट्रो सोडून दळणवळणासाठी दुसरी साधने नसल्याने खारघर, तळोजा भागातील रहिवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
नवी मुंबई शहराचा विकास करताना पनवेल परिसरात पसरलेल्या उपनगरांना हार्बर रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी सिडकोने मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेलापूर रेल्वे स्थानक तळोजा- पेंधर असा 12 किलो मीटर मेट्रो मार्ग बनविण्याचा काम हाती घेण्यात आले. 2011 साली सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर 11 रेल्वेस्थानक उभारण्यात येणार होते. मात्र दहा वर्ष होत आली तरी अद्याप मेट्रो प्रकल्प पुर्णत्वास गेलेला नाही.
नागपूर मेट्रो प्रकल्प नवी मुंबईच्या नंतर सुरू होऊनही आधी पुर्णत्वास गेला. बेलापूर –पेंधर या मेट्रो लाईनचे काम हाती घेतल्यापासून तीन ठेकेदार बदलण्याची वेळ सिडकोवर आली आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याने सिडकोने मेट्रो रेल्वे उभारण्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. खारघर, तळोजा, पेंधर भागात मेट्रो रेल्वे येणार असल्याचे स्वप्न दाखवत सिडकोने 25 ते 30 हजार घरे सर्वसामान्यांच्या गळ्यात मारली.
दुसरीकडे खाजगी बिल्डरांनी मेट्रोचे फोटो आपल्या होम प्रोजेक्टमध्ये दाखवत चढ्या किंमतीला घरे विकून करोडो रूपयांचा मलिदा कमवला. मेट्रोतून प्रवास करायला मिळणार या आशेवर घरे विकत घेतलेल्या सर्वसामान्यांचा मात्र मेट्रो रखडल्याने चांगलाच हिरमोड झाला आहे. मेट्रो सोडून दुसरी दळणवळणाचे साधन उपलब्ध नसल्याने लोकांना रिक्षापोटी महिन्याला हजारो रूपये खर्च करावे लागत आहेत.
दरम्यान सिडकोने सध्या मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू केली आहे. तळोजा ते खारघर सेंट्रलपार्क स्थानकादरम्यानच्या 505 किलो मीटर अंतरापर्यंत चाचणी करण्यात आली. या दरम्यान पाच रेल्वे स्थानके येत असून यावर मेट्रो धावणार आहे. सीबीडी ते तळोजा हे 11 किलो मीटरचे अंतर असून एकूण ११ मेट्रो रेल्वे स्थानके आहेत.
नवी मुंबई मेट्रो कामाची प्रत्यक्ष सुरवात 2011 साली झाली. 2011 रोजी मेट्रो प्रकल्पाची किंमत दोन हजार कोटी रुपये होती. 2021 रोजी मेट्रो प्रकल्पाची किंमत 3063 कोटींवर पोहोचली आहे. 2014, 2016, 2018, 2020, 2021 अशी पाच वेळा मेट्रो रेल्वे सुरू होण्याची डेडलाईन घोषित केली. सिडकोकडून एकूण 4 मेट्रो मार्ग घोषित करण्यात आले. याचा एकूण खर्च 8 हजार 904 कोटी रूपये आहे.