मुंबई : नवी मुंबई... कॉर्पोरेट्सचं नेक्स्ट डेस्टिनेशन. मुंबईच्या शेजारी असलेलं नियोजनबद्ध शहर. मोठे रस्ते, भरपूर मोकळी जागा, मोठ्या इमारती, मुबलक पार्किंग स्लॉट्स, चांगली आरोग्यसेवा, वर्ल्ड क्लास पार्क्स... ही नवी मुंबईची ओळख आहे.

दहा वर्षापूर्वीपर्यंत नवी मुंबईत यायला कॉर्पोरेट्स उत्सुक नव्हते. पण हा ट्रेंड गेल्या पाच वर्षांत बदलू लागला आहे. रिलायन्स, एल अँड टी, कॅपजेमिनीसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी आपलं बस्तान नवी मुंबईत हलवलं. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळाच्या कामानं जोर पकडला. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई उद्योग जगतासाठी हॉट डेस्टिनेशन होणार आहे.

मुंबईत पाय ठेवायला जागा नाही. कॉर्पोरेट अधिकारी असो किंवा मग साधा कामगार प्रवास करताना दमछाक होते. शिवाय जागांचे दर गगनाला भिडलेत. अशावेळी नवी मुंबईसारखा पर्याय कुठे सापडणार?

जेएलएएल प्रॉपर्टी कन्सलटंटच्या मते, पुढच्या 5 वर्षात 344 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जवळपास 80 लाख स्क्वेअर फूट
जागेवर आयटी पार्क उभी राहतील. शहराचं नियोजन करणारं सिडको खारघरमध्ये 120 हेक्टरवर आयटी पार्क उभारण्याची तयारी करत आहे.

ही जागा इतकी मोठी आहे, की इथं दोन बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स उभी राहतील. सध्या सिडकोनं वाशी आणि बेलापूरमध्ये 16 लाख स्क्वेअर फूटावर आयटी पार्क उभी केली आहेत.

याशिवाय मेट्रोचं जाळं विणण्याचं काम सुरु आहे. रेल्वेची कनेक्टिविटी उरणपर्यंत पोहोचली आहे. विमानतळाचं काम वायुवेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात नवी मुंबईचं महत्व मुंबईच्या तुल्यबळ असेल.

नवी मुंबई कॉर्पोरेट्सच्या डोळ्यात भरण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्वस्ताई. राहण्यासाठी, कार्यालयांसाठी, हॉटेल्ससाठी लागणारी जागा मुंबईपेक्षा स्वस्त आहे.

आता जेव्हा कॉर्पोरेट्स नवी मुंबईत येतील, तेव्हा रस्ते, वीज, पाणी, शिक्षणाच्या सुविधा उत्तम असाव्या लागतील. तर सिडकोनं आधीच पुढच्या 100 वर्षाचं नियोजन करत मूलभूत सुविधा कमी पडणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. स्वत:च्या मालकीचं धरण उभारणारी नवी मुंबई आशियातली पहिली पालिका आहे.

याशिवाय भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, विद्यापीठ, एमजीएम, तेरणा अशा नामवंत कॉलेजेसमुळे नवी मुंबई आधीच एज्युकेशनल हब बनलंय. त्यामुळे मुंबईचा भार थोडा हलका होईल, मुंबईला मोकळा श्वास घेता येईल, यात शंका नाही.