ठाणे : सलग चार दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील साकेत पुलाला तडे गेले आहेत. महामार्गावर हा पूल असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्याच्या खाडीवर साकेत पूल आहे. नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर पुलावरील दोन गर्डरच्या मधोमध रस्त्याचा काही भाग काल मध्यरात्रीच्या सुमारास खचला. त्यामुळे संपूर्ण रस्त्याला मोठा तडा गेला. पुलावरील रस्त्याला तडा गेल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्याची पाहणी केली.
रस्त्याला गेलेल्या तड्यामुळे पुलाला काहीही धोका नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मात्र अवजड वाहनांमुळे रस्ता खचण्याची भीती आहे. त्यामुळे पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवली आहे. याशिवाय रस्त्यावर काही भागात बॅरिकेड्स लावली आहेत. बॅरिकेड्समुळे इतर वाहनांचाही वेग मंदावला आहे.
पुढील चार तासात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.