नवी मुंबई : निराधार, वयोवृध्द, मतिमंद असलेल्या ऐरोलीती आश्रमात कोरोनाने शिरकाव केल्याने मनपा प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली होती. आश्रमात 60 वर्षे वयाच्यावर असलेल्या महिलांना आधीच विविध आजारांनी ग्रासले आहे, अनेक जणी मतिमंद असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचार करायचे कसे? अशा प्रश्न मनपा आरोग्य विभागासमोर उभा होता. अखेर आश्रमालाच कोरोना सेंटरमध्ये परावर्तीत करीत अनेकांचे जीव वाचविण्यात मनपाला यश आले आहे.


नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये असलेले प्रेमदान आश्रम हे महिलांसाठी असून येथे 144 जणी राहतात. निराधार, वयोवृध्द, मतिमंद असलेल्या महिलांची तपासणी केली असता 144 पैकी 122 जणींना कोरोनाची लागण झाल्याचे मनपाच्या लक्षात आले. एकाच संस्थेतील 100 च्यावर महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मनपासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती होती. मतिमंत, अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या महिलांना पालिकेच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणे शक्य नसल्याचे डॉ. कोविड टेस्टींग मोहिमेचे समन्वयक डॉ. सचिन नेमाने आणि रबाळे नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तळेगावकर यांच्या लक्षात आले. या परिस्थितीची माहिती मनपा आयुक्तांना देण्यात आली. अखेर ऐरोलीत असलेल्या प्रेमदान आश्रमालाच कोविड केअर सेंटरमध्ये परावर्तीत करायचा महत्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. सर्व महिलाच आहेत हे लक्षात घेऊन आरोग्य पथकामध्ये डॉक्टरांपासून सर्वजण महिलाच असतील याची दक्षता घेण्यात आली. 14 डॉक्टर्स आणि 15 पॅरामेडिकल स्टाफ नेमण्यात आला. निराधार, दिव्यांग, व्याधीग्रस्त तसेच मोठ्या प्रमाणात वयाने ज्येष्ठ असलेल्या महिलांची सेवा करताना आरोग्य सेवेसोबतच मानवतावादी दृष्टिकोन ठेवत अतिशय समर्पित वृत्तीने काम सुरु केले.


आश्रम नियमितपणे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण केले जाईल, तसेच स्वच्छता राखली जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली. जेवणाची व्यवस्था मनपाकडून करण्यात आली होती. बी.सी, सी.पी.आर, एल.टी, फेरिटीन, टी-ट्रॉप, ब्लड शुगर अशा विविध तपासण्या मनपाकडून करण्यात आल्या. प्रेमदानच्या आवारात रूग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध ठेवणेबाबत कार्यवाही करण्यात आली. प्रेमदान मधील एखाद्या महिला रूग्णास आवश्यकता भासल्यास आय.सी.यू. बेड्सची सुविधा नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयामध्ये आरक्षित ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी विशेषत्वाने निर्देश दिले होते.


यादृष्टीने जोखमीच्या व्यक्ती मानल्या जाणाऱ्या उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी अथवा हृदयाचे आजार अशा सहव्याधी (को-मॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. प्रेमदानमध्ये तर त्यांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या दृष्टीने हे एक आव्हान होते. तथापि जलद रूग्ण शोध घेऊन प्रत्येकाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची काळजी घेतल्यामुळे प्रेमदान मधील शारीरिक-मानसिक अडचणी असणाऱ्या महिलांना कोरोनावर मात करण्यात महानगरपालिकेच्या आरोग्य समुहाला यश लाभले.


अखेर 122 जणींपैकी 116 पूर्ण बऱ्या झाल्या असून 4 जणींवर अजूनही उपचार सुरु आहेत. दुर्देवाने यातील 2 महिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.