नवी मुंबई : प्रांत अधिकारी असल्याचे सांगून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतयाला खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. तुषार ठिगळे असं 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे.  आरोपीने पुणे निगडी येथे प्रांत अधिकारी असल्याचे सांगून खोटे ओळखपत्र दाखवले व स्वतःचे पहिले लग्न झालेले असताना 23 वर्षीय तरुणीसोबत लग्न करून फसवणूक केली होती.


तसेच संबंधित तरुणीच्या घरच्यांना देखील रेल्वेत नोकरी लावून देतो व सरकारी लॉटमधील सेकंड हँड कार स्वस्तात देतो म्हणून 1 लाख 95 हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली होती. संबधित व्यक्ती गाडीला अंबर दिवा लावून सोबत बाऊन्सर घेऊन फिरत असे. त्याने मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक परिसरात मुलींना लग्नाचे अमिष दाखवून, नोकरीला लावतो किंवा गाड्या खरेदी करून देतो असे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे. त्याने तब्बल 1 कोटी 65 लाख 56 हजारांची फसवणूक केली आहे. संबंधित व्यक्तीस नेरुळ येथून अटक खांदेश्वर पोलिसांनी अटक केले आहे.




 खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 23 वर्षीय तक्रारदार तरुणीने सांगितले की, आरोपी तुषार थिगळे दुसरे लग्न करून फसवणूक केली होती. तसेच हा प्रांत अधिकारी बनून फिरत असताना त्याच्याकडील गाड्यांना अंबर दिवा व सोबत बाऊंसर असे. त्याने यापूर्वी मुंबई, पुणे, नाशिक, खालापूर, ठाणे व पनवेल येथे अशा प्रकारे मुलींना लग्नाचे अमिष दाखवून, नोकरीस लावतो किंवा गाड्या खरेदी करून देतो असे सांगून बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलिस पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष टीम तयार केली होती . सदर आरोपी हा वारंवार फोन नंबर व लोकेशन बदलत असतानाही तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराकडून बातमी काढून त्याला नेरूळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून आत्तापर्यंत त्याने १ कोटी ६५ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.