नवी मुंबई : अनेकदा अचानक लागलेल्या छोट्या आगीचे रूपांतर महाकाय ज्वाळांमध्ये होताना दिसते. कारण ती छोटी आग तात्काळ रौद्र रूप धारण करते. अग्निशमन विभागाला वाहतूक कोंडी, खड्डे किंवा चिंचोळ्या गल्ल्यांमधून वाट काढणे मुश्कील होते. मात्र आता 'फायर बाईक' या कामात सिंहाचा वाटा उचलणार आहेत. फायर बाईक त्वरित जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याने याचा मोठा फायदा अग्निशमन दलाला होणार आहे. 


नवी मुंबईत शहरी भाग मोठा असला तरी यामध्ये जुनी गावठाणे आहेत. त्यामुळे या गावांत अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या असल्याने वाहन जाणे अवघड आहे. त्याच बरोबर शहराच्या पूर्वेला डोंगराला लागून मोठा झोपडपट्टी परिसर आहे. येथील रस्तेही अरूंद आहे. त्यामुळे अशा चिंचोळ्या आणि अरूंद रस्त्यांमुळे लागलेल्या आगीच्या ठिकाणी पोहोचणे अग्निशमन विभागाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागते. अशात उशीर झाल्यास आगीचे स्वरूप भीषण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते किंवा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हेच लक्षात घेऊन अग्निशमन विभागाने फायर बाईक आपल्या दलात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. 


या फायर बाईकमध्ये  पाण्यासोबतच 'वॉटर मिस' हे नवीन तंत्रज्ञान आहे जे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्यापेक्षा दहा पट जास्त प्रभावशाली आहे. त्यामुळे अशा अडचणींच्या भागात आगीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार असल्याचे नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहन अपघातात तसेच वाहनांमध्ये अचानक लागेल्या आगीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दलाची मोठी गाडी पोहचण्यास विलंब लागतो. अशावेळी ही फायर बाईक ती वाहतूक कोंडी भेदत घटनास्थळी पोहचून आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या वाहनांच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या फायर बाईक कामाला येणार आहेत. 


सध्या पाच फायर बाईक अग्निशमन विभागात  दाखल झाल्या असून त्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, सीबीडी या अग्निशमन केंद्रात प्रत्येकी एक अशा ठेवण्यात आल्या आहेत. पुढे गरजेनुसार यात वाढ होणार आहे. 'रॉयल एनफिल्ड हिमालयीन 350'  या कंपनीच्या या बाईक्स असून पाच ही बाईक्सची नोंदणी फायर बाईक्स म्हणून करण्यात आली आहे. 411 CC याची इंजिन क्षमता असून या बाईकला 5 गियर आहेत. पेट्रोलवर चालणारी ही बाईक BS- 6 या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेत तर याला I-CAD ने मान्यता दिलेली आहे. पाणी आणि पेट्रोल मुबलक प्रमाणात असल्यास ही बाईक बिना व्यत्यय अग्निशमनाची सुविधा नागरिकांना देऊ शकते.


फायर बाईक्सची वैशिष्ट्ये



  • या फायर बाईक्सवर ४० लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. 

  • 100 बार प्रेशरने आग विझवू शकते. सोबतच पाण्याच्या टाकीत फोमचा वापर करून आग आटोक्यात आणता येते.

  • सदर फायर बाईकचा 15 ते 20 मीटरपर्यंत जेट असून 20 मीटरपर्यंत आग आटोक्यात आणू शकतो.

  • विमानतळावर जसे चालू विमानवर आगीवर नियंत्रण मिळवता येते त्याच प्रकारे चालू गाडीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याची 'रोझंबर' पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळवता येते.

  • या फायर बाईक्सवर दोन अग्निशमन कर्मचारी असतात. त्यापैकी एक ऑपरेटर आणि एक चालक.

  • या बाईक्सवर सायरन व अग्निशमन दलाचा दिवा बसवण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून सहज मार्ग काढत घटनास्थळी विनाविलंब सहज पोहचू शकते.