नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे भागात व्यावसायिक शांताराम कुटाळ यांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना 48 तासात यश आलं आहे. प्रेम प्रकरणातून कुटाळ यांचा जीव घेण्यात आल्याचं समोर आलं आहे.
व्यवसायिक शांताराम कुटाळ यांची बुधवारी रात्री गोळ्या झाडून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. आपल्या प्रेयसीला पळवून नेल्याच्या रागातून आरोपी अनिल डेरे यांनी ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.
अनिल डेरे यांनी आपल्या प्रेयसीला अहमदनगरमधील आळेफाटा भागात ठेवलं होतं. मात्र शांताराम कुटाळ आणि अनिल डेरे यांच्या प्रेयसी मध्ये प्रेमसंबंध जुळले.
काही दिवसांनी शांताराम यांनी तरुणीला पळवून कामोठे येथील आपल्या घरी आणून ठेवलं. आपल्या प्रेयसीशी प्रेमसंबंध जुळवून तिला पळवून नेल्याचा राग अनिल डेरेंच्या मनात धुसफुसत होता.
डेरे यांनी आपल्या दोन साथीदारांसह शांताराम कुटाळ यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.