Navi Mumbai Airport Name Row LIVE Updates : आंदोलनामुळे नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू

Navi Mumbai International Airport Name Row LIVE Updates : नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील (Di Ba Patil) यांचं नाव देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज (24 जून) सिडकोला घेराव घातला जाणार आहे. एक लाख स्थानिक या आंदोलनात सहभागी होणार असून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2021 04:39 PM
आंदोलनामुळे नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू

नवी मुंबई - आंदोलनामुळे नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू, सर्व मार्गाने वाहतूक सुरू , नवी मुंबई वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरू केल्याची घोषणा

15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू, स्टेजवरुन आंदोलकांची घोषणा

15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू, अशी घोषणा आंदोलकांनी स्टेजवरुन केली आहे. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी आंदोलकांनी सिडकोला घेराव घातला. नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं. 

नवी मुंबईतील आंदोलकांचं शिष्टमंडळ सिडको भवनाकडे रवाना, संजीव नाईकांच्या नेतृत्त्वाखाली निवेदन देणार

नवी मुंबईतील आंदोलकांचं शिष्टमंडळ सिडको भवनाकडे रवाना झालं आहे. संजीव नाईकांच्या नेतृत्त्वाखाली हे शिष्टमंडळ निवेदन देणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन, मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात

नवी मुंबईतील सिडकोवर स्थानिकांचं आंदोलन होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक आज आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून नवी मुंबईला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. 

बाळासाहेबांचं नाव हृदयात पण विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे : माजी आमदार सुभाष भोईर

"बाळासाहेबांचं नाव आमच्या हृदयात आहे पण नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. आज भूमिपुत्र म्हणून आलो आहे, पक्ष भावना बाजूला आहे. मी बाळासाहेबांच्या रोज पाया पडतो पण दि बा पाटील यांचं योगदान नवी मुंबईत मोठं आहे. त्यामुळे त्यांचं नाव दिलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिली.

विमानतळाला दि बा पाटील यांच्या नावासाठी आंदोलन, उरणमधील महिलांची गाण्याच्या माध्यमातून टीका

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी भूमिपुत्रांचं आज सिडकोला घेराव आंदोलन होत आहे. यासाठी गावकरी सज्ज झाले आहेत. उरण तालुक्यातील जासई इथल्या महिलांनी गाण्याच्या या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गावकऱ्यां रचलेले हे गाणे...

"पोलिसांनी अडवल्यास त्याच ठिकाणी बसून आंदोलन करु", नवी मुंबईत आलेल्या आंदोलकांचा पोलिसांना इशारा

नवी मुंबईत स्थानिकांचा एल्गार, सर्व आंदोलक सिडकोला आज घेराव देणार आहेत. दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आंदोलन सुरु झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच "पोलिसांनी अडवल्यास त्याच ठिकाणी बसून आंदोलन करु", असा इशारा नवी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. 

मनसेचे आमदार राजू पाटील स्थानिकांच्या आंदोलनात सहभागी, राज ठाकरेंकडून मात्र नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव देण्याची भूमिका

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद, मनसेचे आमदार राजू पाटील स्थानिकांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मात्र नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुईनगर, तुर्भे, सानपाडाला जोडणारा ब्रीज बंद

नवी मुंबई : वाशी टोल नाका क्राॅस केल्यानंतर जुईनगर, तुर्भे, सानपाडाला जोडणारा ब्रीज बंद करण्यात आला आहे. या ब्रीजखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ब्रीज बंद केल्यानं सामान्य नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय हळुहळु ट्रॅफिक वाढत चाललंय. 

नवी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याआधी तुर्भे गावातील महिलांचं सकाळी लवकर उठून वडाचं पूजन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच नाव देण्यात यावा यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र आज सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. आज वटपौर्णिमा आहे. मात्र मोर्चाला जायचं असल्याने तुर्भे गावातील महिलांनी सकाळी लवकर उठून वडाचं पूजन केलं.

सिडको घेरावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा, वाहतूकही वळवली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच नाव देण्यात यावा यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र आज सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. कायदा व सुव्यस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सिडकोच्या दिशेने अनेक रस्त्यांवरील वाहतूकही वळवण्यात आली आहे.

आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचण्यास सुरुवात, पाच हजार पोलीस तैनात

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. तर नवी मुंबई, पनवेलमध्ये पाच हजार पोलीस दाखल झाले आहेत. दरम्यान सिडको घेरावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. परंतु रस्ते बंद केले तरी आंदोलनात सहभागी होणारच असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीतील पिंपळास गावात मशाल घेऊन जनजागृती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचा नाव द्यावं या मागणीसाठी आज (24 जून) सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील पिंपळास गावातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ग्रामविकास युवा प्रतिष्ठान आणि पिंपळास गावातील काही तरुणांच्या वतीने संपूर्ण गावातून मशाल मोर्चा काढण्यात आला.

पार्श्वभूमी

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (Di Ba Patil)यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज (24 जून) सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. 


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मुख्य म्हणजे नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल होणार आहेत. 




विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी नवी मुंबई, उरण आणि पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. आज 24 जूनला नवी मुंबई व परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. आज नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईहून पुण्याकडे तसेच पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. वाशी टोल नाका, वाशी गाव, पाम बीच मार्ग शिळ फाटा या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. 




तसेच एरोली टोल नाका, रबाळे, शिळफाटा, कळंबोली या मार्गाने देखील पुण्याकडे जाता येईल. दरम्यान गोव्याला जाणारे वाहने देखील नवी मुंबई शहरातील हायवेवरुन न जाता, जेएनपीटी रोड आणि जुना मुंबई-पुणे हायवेवरुन जाणार आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरुन येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.