Narendra Patil on Manoj Jarange : "मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चालला आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे. ते वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. याच फडणवीस यांनी आण्णासाहेब पाटील मंडळ जीवंत करून हजारो मराठा तरुणांना उद्योगासाठी मदत केली आहे. सारथी मधून मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत मिळत आहे", असे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताच नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगेंबाबत माध्यमांशी संवाद साधला आहे.
नरेंद्र पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांनी उगाच भलतीकडे आरोप करू नयेत. नाहीत तर सगळा विषय वेगळ्या मार्गावर जाईल. जरांगे मराठा आणि कुणबीमध्ये वाद निर्माण करीत आहेत.
जरांगे पाटील यांचे आरोप आम्ही फेटाळतो : आशिष शेलार
"मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावे, याचे भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीला आम्ही पाठींबा दिलाय. ज्या करता कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होणे गरजेचे आहे.त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची शपथ पुर्ण केली. देवेंद्रजींबद्दल बोलताना विचार केला पाहिजे. त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळतो. मुंबईला ते येऊ शकतात", अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
"मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले पण हिंसा नाही. आज मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे. सगे सोयरे यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. ती होईपर्यंत तरी त्यांनी शांत राहायला हवे. मराठा समाजाने मोठ्या लोकांनी त्यांना बसवून समजावले पाहिजे. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळावी, उपमुख्यमंत्री यांची नेहमीच भूमिका पाठिंब्याची राहिली आहे, उच्च न्यायालयात देखील त्यांनी हे आरक्षण वाचले होते", असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते जरांगे-पाटील?
"माझ्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या", असं खुलं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. हे षडयंत्र फडणवीसांचे असून शिंदे आणि अजित पवारांचे लोकही यामध्ये सामील असल्याचा आरोप जरांगे पाटील म्हणाले आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीस यांचा हा बामणी कावा आहे, असेही जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या