PM Modi Advice To BJP Leaders : पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत भाजप कार्यकर्त्यांना (BJP Leaders) कानमंत्र दिला आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना सतर्कही केलंय, काहींची कानउघाडणीही केली आहे. लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) आता 400 पेक्षा कमी दिवस उरले आहेत. भाजपने कुठलाही फाजील आत्मविश्वास न दाखवता निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचा, मताची अपेक्षा न करता अल्पसंख्यांकानाही जवळ करा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीचा समारोप मंगळवारी (17 जानेवारी) पंतप्रधानांच्या भाषणाने झाला.
जे. पी. नड्डांचा कार्यकाळ वाढवला
भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वर्षातून एकदा होत असते. पण या बैठकीचं महत्व अधिक आहे कारण, लोकसभा निवडणुकांआधीची ही कार्यकारिणीची बैठक झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान यावेळी काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींचा कानमंत्र
- 18 ते 25 या वर्गाला भारताचा सगळा राजकीय इतिहास माहिती नाही. त्यांना आधीच्या सरकारांच्या भ्रष्टाचाराबद्दल, चुकीच्या धोरणांबद्दल माहिती नाही. त्यांना याची जाणीव करुन द्या, त्या तुलनेत भाजपच्या सुशासनाबाबत अवगत करा
- समाजाच्या सर्व थरांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मतांची अपेक्षा न करता अल्पसंख्यांकांपर्यंतही पोहोचा, चर्चलाही भेट द्या
- अल्पसंख्यांकांबद्दल बोलताना त्यांनी विशेष करुन पसमंदा, बोहरा मुस्लिमांचा उल्लेख केल्याचं काही सूत्रांनी सांगितलं
- बेटी बचाओ प्रमाणे धरती बचाओ या कार्यक्रमावरही लक्ष देण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली
- अमृतकाळाला कर्तव्यकाळात रुपांतरित केलं तरच भारत विकासाच्या मार्गावर पोहोचू शकेल.
'हर फिल्म पे बोलना जरुरी हैं क्या?'
यासोबतच पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यांनी विनाकारण वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. 'हर फिल्म पे बोलना जरुरी हैं क्या?' असा सवाल उपस्थित करत मोदींनी भाजप नेत्यांना विनाकारण वाद निर्माण करण्यापासून दूर राहायला सांगितलं. एक नेते आहेत, जे सतत चित्रपटांबद्दल बोलून चर्चेत राहायचा प्रयत्न करतात त्यांना, राष्ट्रीय अध्यक्षांनी पण एकदा समज दिली. पण त्यानंतरही ते थांबत नाहीत. अशा गोष्टींनी आपण नेते बनू असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असं मोदींनी म्हटलं.
पंतप्रधानांच्या कानउघाडणीनंतर भाजप नेते थांबणार?
पंतप्रधानांच्या कानउघाडणीनंतर तरी आता हे विनाकारणचे वाद थांबणार का पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकांना एक वर्ष उरलं आहे, याच वर्षात 9 राज्यांच्या निवडणुकाही आहेत. जे पी नड्डा यांनी तर एकही निवडणूक गमवायची नाहीय असं लक्ष्य भाजप कार्यकर्त्यांना दिलं आहे. त्यामुळे या कार्यकारिणीतून आणि पंतप्रधानांच्या भाषणातून भाजप नेते किती जोमात सज्ज राहतात हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :