कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 18 डिसेंबर रोजी कल्याणमध्ये येणार आहेत. यावेळी मेट्रोच्या पाचव्या आणि नवव्या टप्प्याचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी नरेंद्र मोदी कल्याणमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी मेट्रो सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं.


मोदींनी दिलेलं तेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते कल्याणमध्ये येत असल्याची माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेच्या फडके मैदानात मोदींची भव्य सभा होणार असून त्याची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. आज पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी कल्याण आणि परिसराची पाहणी केली.


तर एमएमआरडीए आणि महापालिका अधिकारीही फडके मैदानात तळ ठोकून आहेत. दरम्यान, हा सरकारी कार्यक्रम असून त्यात शिवसेनेलाही आपण आमंत्रित करणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे.


विशेष म्हणजे 2016 साली याच परिसरात झालेल्या दुर्गाडी आणि माणकोली पुलांचं भूमिपूजन मात्र शिवसेना आणि भाजपनं वेगवेगळं केलं होतं. त्यामुळं आता तीन राज्यात सत्ता गेल्यानंतर भाजपची भाषा बदलल्याचं पाहायला मिळतंय.