मुंबई : काँग्रेसच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या सरचिटणीसपदावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी राजीनामा देणं, नितेश राणे यांचं नाव निलंबित आमदारांच्या यादीतून अचानक वगळलं जाणं, यामुळे राणेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका करत होते. शिवाय मुंबई महापालिकेच्या निमित्ताने स्थानिक नेत्यांशी त्यांचे खटकेही उडाले होते. तसंच जिल्हा परिषद निवडणुकीतही नारायण राणेंना काँग्रेसची साथ मिळाली नसल्याचं दिसलं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे नाराज आहेत. पण आता ही नाराजी पक्षांतरापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे.
चर्चेच्या आधीच सांगतो की मी निर्णय घेतोय : राणे
दरम्यान सोशल मीडियावर नारायण राणे पक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याविषयी राणेंना बुधवारी विचारलं असता ते म्हणाले की, "शिवसेना किंवा भाजपचे कोणतेही नेते मला भेटले नाहीत किंवा माझ्याशी बोलले नाहीत. मी काँग्रेसमध्येच आहे. काही निर्णय घ्यायचा असेल तर चर्चेच्या आधीच मी सांगतो की निर्णय घेतोय.
अस्वस्थ होऊन सांगणार कोणाला?
याआधी काँग्रेसविषयी बोलताना 'माझा कट्टा'वर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, "अस्वस्थ होऊन सांगणार कोणाला? काही वेळा सहन करावं लागतं, मार्गा काढावे लागतात. योग्य दिसत नाही ते बोलतो. काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसचं कल्चर आत्मसात करावं लागेलच."
भाजपमध्ये जायचं असेल तर लपवेन कशाला?
तसंच भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. "विधानसभेच्यावेळी फॉर्म भरु नका, दिल्लीत येऊन शपथ घ्या, असं भाजपतर्फे सांगण्यात आलं होतं. परंतु ते शक्य नाही. राजकारणात असं होत नाही. अनेकांनी विचारलं असलं तरी मला भाजप जायचंय असं कधीही बोललो नाही. मला जायचं असेल तर सांगनेच, लपवेन कशाला? मी कोणाला घाबरत नाही," असं राणेंनी 'माझा कट्टा'वर सांगितलं होतं.
नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
- 1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश
- 1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी
- 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले
- 1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर
- 1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले
- 1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद
- 1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान
- 1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड
- 2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली
- 2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
-2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी
- 2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड
- 2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड
- 2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण
- 2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा
- 2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा