मुंबई : मार्डच्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी काल बुधवारी केला होता, तरीही मार्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे.
बुधवारी रात्री सायन रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. सायन रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी धरणं आंदोलन सुरु ठेवलं आहे.
‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं आहे, आज (22 मार्च) रात्री 8 वाजता डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचं आश्वासन ‘मार्ड’नं दिलं आहे.’ असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता.
"डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आज माझ्याशी याबाबत चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्याही त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्यांच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या आहेत. त्यांची सुरक्षेविषयीची प्रमुख मागणी आणि इतर मागण्याही आम्ही मान्य केल्या आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आपण संप मागे घेत असल्याचं मला सांगितलं," अशी माहिती महाजन यांनी बुधवारी दिली होती.
एकीकडे गिरीश महाजन यांनी संप मागे घेतल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे आता सरकार आणि मार्डमधील तिढा आणखी वाढला आहे.
‘जर डॉक्टर कामावर रुजू झाले नाही तर मात्र, त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.’ असं महाजन म्हणाले होते.
राज्यात मार्डचा संप तीव्र
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरही रत्नागिरी आणि अकोल्यात संपावर जाणार आहेत. अकोल्यातील तब्बल 600 डॉक्टर संपावर गेले आहेत.
तर रत्नागिरीतील आज (22 मार्च) रात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली जाईल मात्र, इतर कोणत्याही रुग्णाची तपासणी केली जाणार नाही. त्याचप्रमाणे उद्याच्या नियोजित शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या आहेत.
सरकारी निवासी डॉक्टरांना समर्थन देत आता कोल्हापुरातील खाजगी डॉक्टरांनीही बंद पुकारला आहे. कोल्हापुरातील 350 रुग्णालयांतील 1 हजाराहून अधिक डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. काल संध्याकाळपासून या डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवले.
महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ दिल्लीतील 20 हजारांहून अधिक निवासी डॉक्टर आज गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत सामुहिक रजा घेणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये 3 दिवस बंद राहणार आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारने योग्य निर्णय घेतला नाही म्हणून संपूर्ण राज्यात आयएमएने रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रुग्णालयात पूर्वीपासून भरती असलेल्या रुग्णांना उपचार मिळणार आहेत.
दरम्यान आज हायकोर्टात डॉक्टरांविरोधातल्या कारवाईच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता, मात्र मार्ड आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्यानं आज हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
राज्यभरातील सामूहिक रजेवरील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
कोल्हापूरच्या सीपीआरमधील 200 निवासी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कारवाई केली आहे.
यवतमाळमध्ये सामूहिक रजेवरील वसंतराव नाईक शासकीय वैदयकिय महाविद्यालयातील 41 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉक्टर बागडे यांनी कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा
संबंधित बातम्या:
‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’, गिरीश महाजन यांचा दावा
आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार
नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित
हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती