Narayan Rane News :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नारायण राणे यांच्यावर सातत्याने दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दिशाबद्दल समाजमाध्यमावर चुकीची व बदनामीकारक माहिती देत संभ्रम निर्माण करणे या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करा असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई


रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, दिवंगत दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सॅलियनच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.




दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी वक्तव्यं- महिला आयोग


चाकणकर यांनी म्हटलं आहे की, दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणे , तिची प्रतिष्ठा मलिन करणे , तिची व कुटुंबाची बदनामी करणे त्याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधाने करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास 24 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना दिले आहेत, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे. 


लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी


तसेच दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी आणि अर्जदार श्रीमती व श्री. सॅलियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेने व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी,रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Disha Salian Case : दिशा सालियनच्या आई-वडिलांची राणे पितापुत्रांविरोधाच महिला आयोगाकडे तक्रार


Narayan Rane : नारायण राणे दिशा सालियानची बदनामी करतायत; महापौरांची महिला आयोगाकडे तक्रार, चौकशी सुरु


Disha Salian Case : दिशा सालियानची मृत्यूनंतर नारायण राणेंनी बदनामी केल्याचा आरोप, महिला आयोगाकडून दखल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha