मुंबई : मुंबई : कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. यासंदर्भात आता एक महत्वाची माहिती हाती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची आखणी सोमवारी वर्षा बंगल्यावरच करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा कुठे दाखल करायचा? कोणी काय भूमिका घ्यायची याची अंमलबजावणी मंगळवारी सकाळपासून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भात सर्व माहिती शरद पवार यांना देण्यात आली होती. त्यांच्या परवानगी नंतरच कारवाईला सुरवात झाली, अशीही माहिती मिळाली आहे. कारण गृह विभाग राष्ट्रवादीकडे असून महत्त्वाची जबाबदारी गृह विभागाकडे होती.
Narayan Rane : आंदोलन...अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात?
नारायण राणे यांच्या कारवाई संदर्भात महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. नारायण राणे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली तर मुंबईत मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणून नाशिक या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काल नेमकं काय काय घडलं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन ते त्यांना अटक आणि रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या फिल्मी स्टाईलने राजकीय घडामोडी घडल्या. रायगड कोर्टाकडून नारायण राणेंना जरी जामीन मिळाला असला तरी हा राजकीय धुरळा आजही खाली बसण्याची शक्यता कमी आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान महाड येथे सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. "स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती" असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन मोठा वाद झाला.
Narayan Rane : 'मगर आसमान में थुंकने वालो...करारा जवाब मिलेगा'; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
तक्रार दाखल
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.
त्यानंतर नारायण राणे यांच्याविरोधात महाड, आणि पुणे येथेही गुन्हे नोंदवण्यात आला. मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिवसेना आणि इतर पक्षांकडून टीका करण्यात आली. तसेच मंगळवारी युवासेनेच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. अनेक ठिकाणी नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले तर मुंबईतील जुहू या त्यांच्या बंगल्यासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी निदर्शनं केली.
'नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा', 'सामना'तून शिवसेनेचा हल्लाबोल
अटकेसाठी पोलिसांची पथकं रवाना
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणात सुरु होती. काल चिपळूण येथे त्यांचा मुक्काम असताना नाशिकमधून पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी निघालं. त्यानंतर पुण्यातही नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुणे पोलिसांचे एक पथकही नारायण राणेंच्या अटकेसाठी चिपळूणकडे रवाना झालं.
नारायण राणेंचा प्रतिसवाल
आता नारायण राणे यांना अटक करणार का? किंवा केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी पोलीस धजावणार काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी यावर चिपळूणात पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही? तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात. 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री असतानाही त्यांना माहीत नाही, त्यावेळी मी असतो तर... असं म्हणालो होतो. असतो तर... हा क्राईम होत नाही. मी जर आता कानफाडात फोडीन असं म्हणालो असतो, तर हा क्राईम झाला असता. जरा समजून घ्या."
दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाने तो फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांच्या अटकेची टांगती तलवार कायम राहिली.
संगमेश्वरातून अटक
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा संगमेश्वर येथे असताना रत्नागिरी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महाड कोर्टासमोर त्यांना उपस्थित करण्यासंबंधी कायदेशीर बाबींचा चाचपणी करण्यास सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत त्यांना जामीन मिळाला नव्हता.
रात्री उशीरा जामीन मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झालेल्या नारायण राणे यांना रायगड कोर्टाकडून मंगळवारी उशीरा जामीन मंजूर झाला. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी कोर्टात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी कोर्टात केली होती
भाजप नारायण राणेंच्या मागे खंबीर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डी यांनी या प्रकरणी ट्वीट करत म्हटलं की, "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, ही यात्रा सुरुच राहणार आहे."
नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी विरुद्ध शिवसेना असा अंक सुरु?
नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.