Nana Patole in Delhi : राज्यात विधानपरिषदेत काँग्रेसचा झालेला पराभव, तसेच 7 ते 8 फुटलेली मते आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पोहोचले आहेत. राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर दिल्लीतील उच्चपदस्थ नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. इतकंच नव्हे, तर कारवाई करण्यासह बदलांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रथमच विधानपरिषदेच्या निवडणुकीत सात ते आठ मतं फुटल्याची पहिल्यांदाच कबुली दिली आहे. हायकमांड याबाबत नक्की कारवाई करेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थितीबाबतही केंद्रीय निरीक्षक पाठवून कारवाई होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी नाराज असल्याची माहिती
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॅास वोटिंग, फ्लोअर टेस्टमध्ये आमदारांची अनुपस्थिती तसे औरंगाबाद नामांतरावरून पक्षाच्या हायकमांडने दिलेले आदेश न पाळल्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दिल्लीहून एका जेष्ठ नेत्याला Observer म्हणून मुंबईत पाठवून एक रिपोर्ट सोनिया गांधी यांना देण्यात येईल. त्यानंतर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांवर कारवाई होईल, अशी चर्चा आहे.
पक्षाला झालेला दगाफटका, पक्षाविरुद्ध नेत्यांची केलेलं काम हे माफी योग्य नाही, असं पक्ष श्रेष्ठींच मत असल्याच सांगितले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होतील, असा दावा केला जात आहे. कारवाई करण्याआधी स्वत: सोनिया गांधी, राहुल गांधी माहिती घेत आहेत. यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत बोलावलं जात आहे. काल काँग्रेसचे नेते नसीम खान आणि चंद्रकांत हांडोरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
चंद्रकांत हांडोरेंकडून न्याय करण्याची विनंती
या भेटीमध्ये चंद्रकांत हांडोरे यांनी त्यांच्या पराभवासंदर्भात योग्य कारवाई करुन न्याय करण्याची विनंती केली, तर नसीम खान यांनी प्रेदश काँग्रेसमध्ये चालेल्या राजकीय घडामोडींची माहिती राहुल गांधी यांना दिल्ली. आज नाना पटोले यांना दिल्लीत बोलवण्यात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद नामांतरच्या विषयावर काँग्रेस हायकमांडने कॅबिनेटमध्ये विरोध करण्याचे आदेश दिले होते. तरीही काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध केला नाही आणि औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर झालं. यामुळे हायकमांड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणते मोठे फेरबदल होतील? कोणावर कारवाई होईल? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
इतर महत्वाच्या बातम्या