मुंबई : मुंबईतील दोन रेल्वे स्थानक आणि एका विमानतळाच्या नामांतर प्रस्तावाला आज विधानसभेने एकमताने मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एल्फिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी आणि छत्रपती शिवाजी विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.


विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावबदलाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला विधानसभेत एकमताने मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

सीएसटी स्थानकाचं बांधकाम 1887 साली झालं होत. यापूर्वी त्याचं व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असं नाव होतं. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जयंतीनिमित्त हे स्थानक बांधण्यात आलं. मुंबईतील हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन असून मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे.

तर दादर रेल्वे स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' करण्याची मागणी यापूर्वी पुढे आली होती.