मुंबई : नोटाबंदीनंतर देशभरात नव्या-जुन्या नोटांच्या जप्तीचं सत्र सुरुच आहे. मुंबईतल्या टिळकनगरमध्ये कारमधून 10 कोटीच्या जुन्या नोटा आणि 10 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र ही रक्कम वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची असल्याचा दावा केला जात आहे.
कल्याणच्या खडकपाडामध्ये पोलिसांनी व्यापाऱ्याकडून तब्बल 21 लाख 22 हजाराच्या नव्या नोटा पकडल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये 2 हजाराच्या 16 लाखांच्या नोटा आहेत, तर उर्वरित नोटा 500 रुपयांच्या असल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास ही रक्कम अॅक्टिव्हातून घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई केली.
वसईत शिवसेनेचे नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुख धनंजय गावडेंच्या गाडीतून एक कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या 1 कोटी 11 लाखाच्या रकमेत 45 लाखाच्या नव्या दोन हजाराच्या नोटा आहेत. तर उर्वरित रक्कम जुन्या 500 च्या नोटा स्वरुपात आहे. धनंजय गावडे आणि व्यापारी सुदर्शन शेरेगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.