Nalasopara News : पाचव्या मजल्यावरुन पडणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीला सोसायटीतील नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तिची सुखरुप सुटका केली आहे. शुक्रवारी वसई एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र या घटनेत तरुणीला वाचवण्यात यश मिळालं आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील रिलायबल हाईटस् या सोसायटीतील पाचव्या मजल्यावरुन झाकिया खान ही 21 वर्षाची तरुणी चक्कर येवून खाली पडली होती. मात्र तिने चौथ्या मजल्यावरील ग्रीलला पकडल्यामुळे ती वाचली. तिचा हात सुटू नये म्हणून चौथ्या मजल्यावरुन सोसायटीतील सदस्यांनी तिला पकडून ठेवलं होतं आणि अग्निशमन दलाला बोलावलं. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी 5 वाजता पोहोचून अवघ्या दहा मिनिटात तिला रेस्क्यू केलं. चौथ्या मजल्यावरील ग्रील कटरच्या सहाय्यानं तोडून तिला आत घेतलं आणि वाचवलं. अग्निशमन विभागानं मुलीला वाचवल्यानं वसई विरारमधून सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वसईत साडेतीन वर्षाच्या लहानगीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू
गुरुवारी वसईत एका साडेतीन वर्षाच्या लहानगीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. आपल्या दुसऱ्या सात वर्षाच्या मुलीला शाळेत सोडायला आई घराबाहेर गेल्यावर घरी एकटी झोपलेली ही लहानगी उठली आणि मोबाईल खेळताना गॅलरीच्या खिडकीतून मोबाईल पडल्यावर ती बघण्यासाठी वाकल्यावर तिचा तोल जावून ती पडली. यात ती मयत झाली. वसईच्या अग्रवाल टाऊनशीप या हायप्रोफाईल सोसायटीतील रिजन्सी सोसायटीत राहणाऱ्या महाजन कुटुंबावर ही दुर्देवी वेळ आली आहे. महाजन कुटुंब हे E विंगमधील सातव्या मजल्यावरील 702 या रुममध्ये राहते. आई श्रद्धा ही आपली सात वर्षाची मुलगी चिन्मयी हिला शाळेत सोडायला खाली गेली. त्यावेळी त्यांची दुसरी मुलगी श्रेया ही घरी एकटीच झोपलेली होती. मात्र आई खाली गेल्यावर श्रेया अचानक उटली आणि जवळच असलेल्या मोबाईल सोबत खेळत होती. खेळता खेळता ती हॉलच्या गॅलरी येथे गेली. आणि तेथे तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. खाली पडलेला मोबाईल पाहण्यासाठी ती ग्रील वर चढली आणि वाकून खाली बघत असताना, तिचा तोल जावून ती खाली पडली. तिच्या मानेचा हाड तुटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. श्रेया ही अवघी साडेतीन वर्षाची होती. तिचे वडिल अतुल हे कामानिमित्त सिंगापूरला नोकरी करतात.
वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांची योग्य काळजी घेण्याची विनंती ही केली आहे.