Audio clip of Sanjay Raut: शिवसेना नेते आणि खासदार यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपविरुद्ध अखेर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बरीच व्हायरल झाली. त्यात मोठ्या प्रमाणात शिवीगाळ करण्यात आली आहे. ही शिवीगाळ संजय राऊत यांनी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.    


मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी वाकोला पोलिस स्टेशनमध्ये अदाखलपत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आयपीसी 507 अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्ना पाटकर यांना झालेल्या शिविगाळीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी एक लेखी तक्रार वाकोला पोलिस स्थानकात दिली होती. लेखी तक्रारीच्या आधारावर अदाखलपत्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


व्हायरल ऑडिओ क्लिपमधील नेमकं प्रकरण काय आहे?


या 70 सेकंदाच्या ऑडिओ किल्पमध्ये 26 शिव्या देण्यात आल्या आहेत. जी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात संभाषण आणि शिवीगाळ करत असलेली व्यक्ती संजय राऊत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र नेमकं काय आहे यातील प्रकरण. तर मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या जमिनीमधून 1 हजार 34 कोटींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या मुख्य साक्षीदार आहेत. त्यांना साक्ष मागे घेण्यासाठी संजय राऊत धमकावत असल्याची तक्रार पाटकर यांनी केली आहे.   


ऑडिओ क्लिप बाहेर येऊन 24 तास झाले, पण राऊत यांनी ती नाकारली नाही: सोमय्या 


याप्रकरणी बोलताना भाजपने नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत की, स्वप्ना पाटकर यांच्या सुरक्षेची काळजी आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. काही दिवसापूर्वी त्यांना धमकी आली होती. स्वप्ना पाटकर संदर्भात बघणार यांचा दृष्टिकोन स्पष्ट होत आहे. राजकीय पक्षाचे नेते धमकी देत आहेत शिव्या देत आहेत. बलात्काराची भाषा करत आहेत. या प्रकरणात चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी स्वप्ना पाटकर यांचे स्टेटमेंट घेतलं आहे. धमकीच पत्र आहे, त्यात माझं नाव आहे. या प्रकरणात पोलीस सकारात्मक आहेत. ते म्हणाले, स्वप्ना पाटकर यांना ईडीमध्ये जाऊ नका, असं सांगितलं जात होतं. ऑडिओ क्लिप बाहेर येऊन 24 तास झाले. पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ती नाकारली नाही. शिवसेना पक्षप्रमुख यावर मौन आहेत. यात संजय राऊत यांनी एकही शब्द काढला नाही, याच्यावरून आम्हाला भीती वाटत आहे. स्वप्ना पाटकर यांना उद्या काही झालं तर पोलीस जबाबदार असतील.