नालासोपारा : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत नालासोपाऱ्यातील रसिका साळगांवकर या विद्यार्थींनीने चक्क ९९.४० टक्के दहावीच्या परीक्षेत गुण मिळवत अवघ्या साडेचार हजारात घर चालवणाऱ्या आईच्या कष्टाचं चीजं केलं आहे.
रसिका तरंग साळगांवकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मुंबई येथील कार्यालयात सिनिअर क्लार्क म्हणून नोकरी करत असलेले रसिकाचे वडील तरंग साळगांवकर यांचं जानेवारी २०१५ रोजी आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. रसिकाची मोठी बहीण अपूर्वाचं देखील इंजिनिअरींगचं शिक्षण सुरू होतं. वडीलांच्या आकस्मिक जाण्यानं घरची जबाबदारी रसिकाची आई मिनाक्षी साळगांवकर यांच्यावर आली. नालासोपारा पश्चिमेकडील श्रमिक महिला विकास संस्थेमध्ये अवघ्या साडेचार हजारात रसिकाच्या आईने नोकरीला सुरूवात केली.
अवघ्या साडेचार हजारात महिनाभर कुंटुंबाचा खर्च चालवावा लागायचा. त्यामुळं रसिकाला कधीच इतर मित्र-मैत्रिणीप्रमाणे हौस मौज करायला भेटली नाही. के.एम.पी.डी. या शाळेनं तिची फी माफ केली होती. तर काही सामाजिक संस्थांनी दिलेल्या शैक्षणिक मदतीने तिने कोणताही क्लास, गाईड न घेता अवघ्या दहावीच्या पुस्तकांवर आणि शिक्षकांनी शिकवणीवर तिनं हे घवघवीत यश मिळवलं.
लाईट बील जास्त येईल त्यामुळे वीजेचा कमी वापर, ऐन उन्हाळ्यात पंखा लावयचा नाही. वीज गेल्यावर एका मेणबत्तीवर तिने अभ्यास सुरू ठेवला. रसिकानेही कधी आपल्या आईकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट केला नाही. आईची परिस्थिती ओळखून तिनं शाळेचं दोन किमी अंतर नेहमी पायी तुडवलं. खिशातील पाच रुपयेही खर्च करणं रसिकाच्या जिवावर यायंचं. आज तिच्या या घवघवीत यशानं रसिकाच्या आईच्या डोळ्यातील अश्रू अनावर होतं आहेत.
रसिकाला आर्किटेक्चर बनायचं आहे आणि आपल्या आईला सुखात ठेवण्याची इच्छा आहे. रसिकाने ९९ टक्क्याचं उद्दिष्टचं आखून ठेवलेलं. त्यामुळेच भिंतीवर तिने ९९ टक्के लिहूनही ठेवलं होतं. घराच्या भिंतीवर तिने अभ्यासातील महत्त्वाचे मुद्देही लिहून ठेवले होते.
रसिकाच्या या उत्तुंग यशाने सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून तिला मदत करण्याचं आश्वासन नगरसेवकांनी दिलं आहे.
रसिकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवलं आहे. पण तरी पुढच्या शैक्षणिक खर्चाची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला खऱ्या अर्थानं आर्थिक मदतीची गरज आहे.