मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना न्यूमोनिया झाला असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
यशवंत देव यांना अशक्तपणामुळे 10 ऑक्टोबरपासून शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीमध्ये सुरुवातीला त्यांना चिकनगुनियाची बाधा झाल्याचं समजलं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचं मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं होतं. त्यांनतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. शेवटी त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरु झाल्याने त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती.
संगीतकार, गायक, कवी अशी ओळख
यशवंत देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा त्यांनी पुढे कायम चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात लग्नानंतर यशवंत देव यांनी रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत त्यांनी ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर 1951 मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले.
यशवंत देव यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली आहेत. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.
आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. याचबरोबर, संगीतविषयक कार्यशाळा त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत. कवितालेखन, रुबाया लिहिल्या आणि कृतज्ञतेच्या सरी त्यांच्या लेखणीतून बरसल्या. तसेच विडंबनगीते केली. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी
- या जन्मावर या जगण्यावर
- जीवनात ही घडी अशीच राहु दे
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
- दिवस तुझे हे फुलायचे
- येशिल येशिल येशिल राणी तू
- अशी पाखरे येती आणिक
- असेन मी नसेन मी
- कुठे शोधिसी रामेश्वर
- ठुमकत आल्या किती गौळणी
- काही बोलायाचे आहे
- डोळ्यात सांजवेळी आणू
- गणपती तू गुणपती तू
- कुणी काही म्हणा
- कामापुरता मामा
- करिते जीवनाची भैरवी
- या जन्मावर या जगण्यावर
- जीवनात ही घडी अशीच राहु दे
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
- दिवस तुझे हे फुलायचे
- येशिल येशिल येशिल राणी तू
- अशी पाखरे येती आणिक
- असेन मी नसेन मी
- कुठे शोधिसी रामेश्वर
- ठुमकत आल्या किती गौळणी
- काही बोलायाचे आहे
- डोळ्यात सांजवेळी आणू
- गणपती तू गुणपती तू
- कुणी काही म्हणा
- कामापुरता मामा
- करिते जीवनाची भैरवी