मुंबई : सी-लिंकपासून ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत येणाऱ्या 714 मीटर लांब उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे येथील स्कायवॉक तोडण्याचा निर्णय महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र यामुळे पादचाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

या स्कायवॉकची दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी पाचवाजेच्या दरम्यान तोडण्यात आली तर उत्तरेकडील मार्गिक रविवारी रात्री 11 ते सोमवारी सकाळी पाच वाजेदरम्यान तोडण्यात येणार आहे. यावेळी या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

714 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर स्कायवॉकच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्यात येणार आहेत तोपर्यंत मात्र मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

वांद्रे स्कायवॉक तोडकामादरम्यान वाहतुकीच्या मार्गातील तारखेनुसार बदल करण्यात आला आहे. 22 जूनला पश्चिम द्रुतगती महामार्गावर खेरवाडी पुलापासून कलानगर पुलापर्यंत दक्षिणेकडील वाहतूक शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे पाचपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केली होती.

यावेळी वाकोला पुलाकडून येणारी वाहतूक माहिमकडून पुढे खेरवाडी, खेरवाडी जंक्शन, भास्कर कोर्ट जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन, पुढे धारावी टी जंक्शन अशी करण्यात आली होती.

तप 23 जूनला, रविवारी रात्री 11 ते ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत माहिम कॉजवे जंक्शनपासून कलानगर पूल फायर ब्रिगेडपर्यंत उत्तरेकडील वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून माहिम उत्तर दिशेने येणारी वाहने एस. व्ही. रोडवरून पुढे जातील. तर सी लिंककडून येणारी वाहने पश्चिम द्रुतगती महार्गावर वांद्रे रिक्लेमेशन येथे डावे वळण घेतील आणि एस.व्ही. रोडवरून पुढे जातील.