कल्याण : डोंबिवलीच्या नांदीवली परिसरातील नाल्यात आज चक्क हिरव्या निळ्या रंगाचं पाणी आल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाण्याचा उग्र दर्प येत असल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास झाला.


डोंबिवली पूर्वेला नांदीवली परिसर असून येथून मोठा नाला वाहतो. या नाल्यात आज संध्याकाळच्या सुमारास अचानक रंगीत पाणी आलं. या पाण्याला उग्र स्वरुपाचा घाणेरडा वासही येत होता. हा नाला डोंबिवली एमआयडीसी परिसरातून वाहत येतो. त्यामुळे एमआयडीसीतल्या एखाद्या रासायनिक कंपनीतून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.



यापूर्वीही डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तसेच रासायनिक प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.