Mumbai Local Megablock: मुंबईत आज मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. 


मध्य रेल्वेवर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत (Megablock on Central Railway)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर  धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचेल.


ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि  माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील.  पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित  वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानावर पोहोचतील.


हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत (Megablock on Harbour Railway)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील, असंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. 


मुंबईत मुसळधार पाऊस 


कालपासूनच मुंबईत पावसानं धुमशान घातलं होतं. मुंबईत जोरदार पाऊस बरसत होता. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरुन जाणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मागील अर्धा पसापासून मुंबई उपनगरातील दहिसर भागात सुरू झालेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळील सुहासिनी पावसकर सबवे परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. अशातच हवामान विभागाकडून आज दिवसभर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.