Mumbai Woman Assaulted : मुंबईतील (Mumbai) मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा (MNS) उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अरगिले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती महिलेनं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

  


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका मेडिकल शॉपसमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला. जिचं नाव प्रकाश देवी सांगितलं जात आहे. त्यांनी ते बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले याच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली. 


मनसे उपविभाग प्रमुख विनोद आरगिले यांनं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, महिलेनं आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं. तिनं आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचं नाही का? आम्ही महिलांचा आदर करणं गरजेचं आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणं गरजेचं आहे, असंही मनसे पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ : मंडप उभारण्याच्या वादावरून महिलेला मारहाण, मारहाण करणारा मनसेचा पदाधिकारी



मनसे उपविभाग प्रमुखानं एबीपी माझाशी बातचित करताना दिलेल्या माहितीनुसार, गणपतीच्या मंडपासाठी बांबू उभारले जात होते. महिलेनं मेडिकल शॉपच्या समोर बांबू लावण्यास विरोध केला. त्यानंतर संबंधित महिलेच्या मेडिकल शॉपपासून काही अंतरावर हे बांबू उभारले जात होते. पण त्यानंतर महिलेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते भडकले. त्यानंतर त्यांनी महिलेला मारहाण करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.


दरम्यान, याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलिसांकडून या प्रकरणाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, तसेच कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिलेनं याबाबत बोलताना सांगितलं की, गणेशोत्सवामुळे त्यानंतरच यासंदर्भात कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी महिलेला सांगितलं आहे. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील दृश्य बोलकी आहेत. त्यामुळे अशा प्रकारची मारहाण करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पटकं का? तसेच, या प्रकाराबाबत मनसेच्या परिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.