मुंबई : मुंबईला पाणी शुद्ध करुन पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईत रविवारी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पाणी साचल्याने येथील पम्प बंद पडले आहेत. त्यामुळे तेथील पाण्याचा निचरा केल्याशिवाय पंप दुरुस्तीचे काम करता येणार नसल्याने, संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा बंद रविवारी राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज पाणी जपून वापरावं. पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.


भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली.  दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरु करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.


मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरांत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.


भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) आणि उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. 


संकुलातील उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो.  


मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी 3800 दशलक्ष लिटर अर्थात 380 कोटी लिटर पण्याचा पुरवठा केला जातो. पण रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची भांडुप संकुल परिसरात अधिक नोंद झाली. त्यामुळे हे संकुल पाण्याखाली गेले असून, पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे.


सध्या पाणी उपसण्याचे काम सुरु आहे, ते झाल्यानंतर पंप सुरु केले जातील. जर हे काम लवकर झाल्यास उशिरा मुंबईला पाणीपुरवठा केला जाईल, असे महापालिकेनं स्पष्ट केले आहे.


मुंबईला तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांतून पाणीपुरवठा होतो. या धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे 15 लाख दशलक्ष लिटर आहे. मुंबईची पाण्याची दररोजची मागणी 4 हजार 450 दशलक्ष लिटर असून प्रत्यक्षात 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.