मुंबई : मुंबईत (Mumbai) पुढील 24 तास पाणीकपात (Water Shortage) करण्यात येणार आहे. पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा (Panjrapur Water Treatment Plant) वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार आहे. संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग या परिसरांत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पुढील 24 तासांसाठी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर पूर्व उपनगरे, शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण, ई तसेच बी विभागातील काही परिसरांमध्ये पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.


वीज उपकेंद्राकडून होणारा विद्युत पुरवठा खंडीत


पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा वीज उपकेंद्राकडून होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला. हा बिघाड शोधण्यासाठी वीज पारेषण कंपनीकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, महानगरपालिकेच्या जल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करुन अवघ्या एका तासांत पर्यायी वीजपुरवठा सुरु केला. जलशुद्धीकरण यंत्रणा टप्प्या-टप्प्याने पूर्वपदावर आणण्यात येत आहे. 


पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात यश 


पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील 100 केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज, 6 मे सकाळी 10 वाजता अचानक खंडीत झाला. परिणामी संपूर्ण जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा बंद झाल्याने पिसे येथून उदंचन केले जाणारे पाणी देखील थांबवावे लागले. असे असले तरी, महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करुन, वीज पारेषण कंपनीशी समन्वय साधून सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुसऱ्या बाजुने पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. परिणामी, मुंबई महानगराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडीत न होता हळूहळू सुरु करण्यात येत आहे. या वीज बिघाडाच्या कालावधीत तसेच बंद पडलेली यंत्रणा पूर्वपदावर येईपर्यंत जलाशये, तसेच सेवा जलाशयांमध्ये आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नसल्याने त्यातील पाणी पातळी खालावली. तसेच मुख्य जलवाहिन्या रिकाम्या झाल्या होत्या.


पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम 


पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वात आधी जलाशयांमधील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने चार्जिंग करणे, या प्रक्रियेला काही वेळ लागणार आहे. या सर्व तांत्रिक कारणांमुळे पांजरापूर येथून मुंबई-1 आणि मुंबई-2 या मुख्य जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे.


त्यामुळे मुंबई-1 या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग या परिसरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पुढील 24 तासांसाठी 10 टक्के पाणीकपात करावी लागणार आहे. तसेच, मुंबई-2 या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पूर्व उपनगरे, तसेच शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण, ई तसेच बी विभागातील काही परिसरांमध्ये पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणीकपात होणार आहे.


जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी लागणार वेळ


वीज पारेषण कंपनीकडून पडघा 100 केव्ही वीज उपकेंद्र ते पांजरापूर 3A 100 केव्ही वीज उपकेंद्र या संपूर्ण मार्गावर वीज बिघाड कुठे झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. पर्यायी वीज पुरवठ्या आधारे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही वेळ आवश्यक आहे. त्यानंतर मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत होईल. तोवर मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असं आवाहन करण्यात पालिकेकडून करण्यात येत आहे.