मुंबई : भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्रात केंद्रीत केलं आहे. युपीत लोकसभेच्या (Loksabha Election) 80 जागा असून महाराष्ट्रात 48 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, गत दोन वेळेसच्या निवडणुकांपेक्षा यंदाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) जास्त सभा होत आहेत. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी मोदींच्या 16 मतदारसंघात सभांचा धडाका आहे. पहिल्या तीन टप्प्यांतील निवडणुकांसाठी मोदींनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या असून आता चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठीही उद्यापासून मोदींच्या सभा होत आहेत. त्यामुळे, भाजपा महायुतीसाठी पोषक वातावरण नसल्यानेच मोदींना महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घ्याव्या लागत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील हेही त्यांनी सांगितले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यंदा महाराष्ट्रात जास्त सभा होत आहेत. त्यामुळे, विरोधकांनी भाजपला विजयाची खात्री नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. कारण विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असे फडणवीसांनी म्हटले. आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहेच. 2014 व 2009 मध्ये मोदीच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढयाच यंदाही होत आहेत. एखाद-दुसरी जास्त असेल. फरक एवढाच की पूर्वी मोदी दिवसाला एक-दोन सभा करायचे, यंदा तीन-तीन सभा झाल्या आहेत. आमच्या नेत्याला ऐकण्यास लोक उत्सुक आहेत. त्यामुळे गर्दी होते, मग मोदींना का बोलावू नये? विरोधकांकडे गर्दीही जमत नाही आणि त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असे उत्तर फडणवीसांनी दिव्य मराठी वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.  


महाराष्ट्रात महायुती 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल


लोकसभेच्या 2014, 2019 च्या निवडणुकीपेक्षाही महाराष्ट्रात यंदा महायुतीच्या जागा वाढतील, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला ही खात्री आहे, जनता मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा 10 वर्षांत रेकॉर्ड बघितल्यानंतर 2019 मधील जागा तर आम्ही राखूच. त्यापेक्षा अधिक म्हणजे 40 पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.


उद्धव ठाकरे-भाजपची पुन्हा युती अशक्य


मोदीनी उद्धव ठाकरेंबद्दल नुकतेच प्रेम व्यक्त केले म्हणजे भाजप-ठाकरेंतील दुरावा कमी होतोय का?, या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे जेव्हा रुग्णालयात होते तेव्हा शिवसेनेशी आमचा टोकाचा संघर्ष होता. कारण त्यांनी विश्वासघात केला. तरीही मोदी एक दिवसाआड उद्धव यांच्या पत्नीस फोन करून विचारपूस करायचे, ही माणुसकी आहे. आम्ही काही शत्रू नाही. केवळ राजकीय, वैचारिक विरोधक आहोत. म्हणूनच, तर मोदींनी 'उद्या जर उद्धव ठाकरेंना वैयक्तिकदृष्ट्या काही मदत लागल्यास मी करेन, पण राजकीयदृष्ट्या मदत करणार नाही,' असे स्पष्ट सांगितले. कारण उद्धव यांनी बाळासाहेबांचे विचार त्यागले आहेत. राहिला प्रश्न पुन्हा जवळीक निर्माण होण्याचा, तर तशी शक्यता मला तरी दिसत नाही, असे स्पष्ट शब्दात फडणवीसांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.