Mumbai Water Crisis : मुंबई (Mumbai) आसपासच्या भागातील उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) तीव्रता एकीकडे वाढत असताना मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांतील (Dam) पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे, तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा (Water Storage) 29 टक्क्यांवर आला आहे.


पाऊस रखडल्यास भीषण टंचाई


मान्सून महाराष्ट्रासह देशात दाखल व्हायला अवकाश आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि परिसर मात्र कोरडाठाक आहे. त्यात आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याच्या बातमीने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.


दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातूनअधिकचे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. 


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा


मध्य वैतरणा : 10.75 टक्के
वैतरणा : 29.91 टक्के
भातसा : 32.48 टक्के
मोडक सागर : 47.98 टक्के
तानसा : 36.99 टक्के


राज्यातील पाणीसाठ्यातही घट


दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. 


यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल निनोचे संकट असल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तुलनेने कमी पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मान्सून उशिरा दाखल झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकणार आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या देखील चिंतेत भर पडणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं  आवाहन करण्यात येत आहे. 


मुंबईतील असह्य उकाडा कमी होईना; तापमानाचा पारा चढाच


मान्सून विलंबाने का होईना आगेकूच करत असतानाच दुसरीकडे राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. मागील आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा खेळ सुरु असून, आता पुढील चार दिवसांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईत मात्र तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे. मुंबईचे कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर असून, आर्द्रता मात्र अधिक आहे. परिणामी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे.


हेही वाचा


Mumbai Water Shortage: मुंबईवर पाणीकपातीचं संकट, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 26 टक्के पाणी शिल्लक