Mumbai Vaccination : देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (बुधवारी) दिनांक 4 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (बुधवार) दिनांक 4 ऑगस्ट 021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
गेल्या महिन्यात देखील मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे लसीकरण कमी झालं होतं. आता साठा प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण बंद ठेवण्याची नामुश्की मुंबई महापालिकेवर ओढवली आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे.