मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. पुणे शहरात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या समित्या आणि कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काँग्रेसला स्थान देत नसल्याचं गाऱ्हाणं पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर मांडलं आहे. यापूर्वीही अशा स्वरुपाच्या तक्रारी नाना पटोले यांच्याकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे पटोले आता काय भूमिका घेतात हे पहाणे महत्वाचे आहे.
याबाबत फोनवरून अधिक माहिती देताना रमेश बागवे म्हणाले की, आम्हाला सातत्याने अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आम्हाला कोणत्याही समित्यांमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. याला वरदहस्त अजित पवार यांचा आहे. तशी तक्रार आज नाना पटोले यांच्याकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला देखील समान वाटा मिळायला हवा, अशी मागणी बागवे यांनी बोलून दाखवली.
दुसरीकडे याबाबत माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते स्थानिक समित्यांच्या निवडीमध्ये स्थान देत नसल्याची पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांची तक्रार माझ्याकडे आली आहे. महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे आम्हाला देखील समान वाटा मिळायला हवा. जर तो मिळणार नसेल तर मात्र आम्ही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहोत.
राष्ट्रवादी-काँग्रेस वाद
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली होती. यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला होता. यावर 2014 साली राष्ट्रवादीने आम्हाला धोका दिला. त्यामुळेच आम्ही स्वबळाची भाषा करत आहोत, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, "नाना पटोले पहिल्यांदा बोलतात, बातम्या सुरु होतात. परंतु, ते त्यानंतर सांगतात की, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही." अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी 15 जुलैला दिली होती. मागील काही दिवसांत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी मध्ये नाराजी निर्माण होईल, अशी वक्तव्य केली होती. यावर शरद पवारांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली होती.