मुंबई : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपारिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर पोहचले आहे. देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली असून देशात पारंपारिक विद्यापीठांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सर्वोत्तम आहे.

क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे.

गेल्या पाच वर्षात विद्यापीठात 104 टक्क्यांनी पदवी आणि 112 टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तसंच दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 147 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.