Teacher Strike : सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.  अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुंबई विद्यापीठ, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठानं उद्यापासून सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचं लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं परीक्षा स्थगित केल्याचं परिपत्रक काढत माहिती दिली. 
 
राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू केले आहे यामध्ये परीक्षा वरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवारपासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.  स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. 




मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दोन फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.  आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. 


अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या काय आहेत नेमक्या मागण्या -


सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा, वीस आणि तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. 


सातवा वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करून एक जानेवारी 2016 पासून ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील फरकाची थकबाकी अदा करण्यात यावी.


विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त अशी ती पदे भरण्यास मान्यता द्यावी.


2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. 


विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून ते आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. 


आणखी वाचा :
राज्यातील विद्यापीठ, कॉलेज कर्मचाऱ्यांचा परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार; सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित