CM Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. वाढते हवा प्रदूषण (Mumbai Pollution) सध्या  मुंबईकरांचा चिंतेचा विषय बनला आहे. एका अहवालानुसार मुंबई (Mumbai News), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane) आणि कल्याण (Kalyan) या चारही औद्योगिक क्षेत्रात जानेवारी महिन्यातील 31 पैकी 31 दिवस म्हणजेच, संपूर्ण महिन्यात हवेची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली, गुडगाव, लखनौप्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत, असे निर्देश शिंदे यांनी बीएमसी आयुक्तांना दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प चार फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. 


मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा, यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील प्रदुषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजन  कराव्यात.


मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करावी. महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत. 


मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी -


मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे 27 टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 


महापालिका शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करावे -


महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत. 


मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा -


मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेकडून लागणाऱ्या इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या आवश्यक त्या परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देताहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुंबई महानगराच्या सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.