मुंबई : समाजात बहिष्कृत असलेली मुली-मुलं ,आत्मविश्वास खचलेले विद्यार्थी, शिक्षणापासून अनेक कारणाने वंचित राहिलेल्या मुलांना हक्काचे छत मिळावं, तसेच मुलांचं हव्या त्या क्षेत्रात शिक्षण व्हावं म्हणून सर्वांनी एकत्र येत मदत करावी यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मैत्रकूल जीवन विकास केंद्राचे संस्थापक किशोर जगताप यांची व्हीलचेअरवर "शिक्षणवारी" निघाली आहे. 


कल्याण ते कुलाबा अशी 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ही यात्रा सुरू आहे. या यात्रेत लोकांनी मदत करावी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं हाच उद्देश आहे. कल्याण, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या जिल्ह्यातून ही यात्रा फिरणार आहे. पायात रॉड असताना ही गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यासाठी झटणारे  किशोर जगताप व्हीलचेअरवर ही यात्रा करत आहेत. या यात्रेत मैत्रकूल केंद्रात असणारे विद्यार्थी देखील सहभागी आहेत.


ही यात्रा  प्रत्येक ठिकाणी फिरत असताना, लोकांकडे असणारी रद्दी, भंगार, पुस्तक आणि जे साहित्य लोकांना आवडीने द्यायचं आहे ते द्या असे आवाहन विद्यार्थी व जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे. मिळालेली भंगार रद्दी  विकून मैत्रकूलचा छोटा मोठा दैनंदिन खर्च भागवाला जाणार आहे. तसेच मैत्रकुलसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून विद्यार्थ्यांचं शिक्षण व विद्यार्थ्यासाठी हक्काची वास्तू खरेदी केली जाणार आहे.


समाजातील अत्यंजांचे दु:ख जाणून त्या उपेक्षितांचे दु:ख दूर करण्याचे कार्य ‘मैत्रकूल जीवन विकास केंद्र’ करत आहे. संस्थेचे संस्थापक किशोर जगताप हे विविध सामाजिक चळवळींशी संबंधित होते आणि आहेत. विविध सामाजिक संस्था स्थापन केल्यानंतर, त्यांना जाणवले की वंचित, पीडित आणि समाजप्रवाहापासून सर्वार्थाने दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचायला हवी. त्यातूनच मग 5 वर्षापूर्वी निर्मिती झाली ‘मैत्रकूल जीवन विकास केंद्रा’ची. हे केंद्र आणि उपक्रम सर्व लोकांनी केलेला मदतीवर चालते. या माध्यमांतून अनेक विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून शिकण घेत तिथेच राहतात. या केंद्रात विद्यार्थ्यांचे गुण ओळखून त्यांना हवे असलेल्या गोष्टी करायला मिळतात.


हळूहळू विद्यार्थी वाढत आहेत. विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी पैसे  देखील हवे आहेत. त्यामुळे मैत्रकुल जीवन विकास केंद्र चालवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि विवीध उपक्रम राबवण्यासाठी एका हक्काच्या स्वतःच्या जागेची गरज आहे. त्यामुळेच अपंगत्वावर मात करत समाजासाठी तन-मन-धन वेचून कार्य करणारे आणि सशक्त सकारात्मक समाजव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून प्रचंड मेहनत करणारे किशोर जगताप. यांनी ही मदतीसाठी शिक्षणवारी सूरू केली आहे.


स्वतः जगताप यांनी अपंगत्वावर मात करत समाजाला उत्तुंग दिशा दाखवण्याचे कार्य गेले अनेक वर्ष, विविध उपक्रम राबवत केले. आता पुढील वाटचालीसाठी त्यांनीही शिक्षण वारी सुरू केली. त्यामध्ये ते फक्त मदतीसाठी आवाहन करत नाहीत तर ज्या विद्यार्थ्याला मदतीची गरज आहे त्यांनी संपर्क साधा असे देखील आवाहन केल आहे. ही शिक्षणवारी सहा तारखेपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येक थांब्यावरील सर्वसामान्य लोक आपल्याकडून होईल ती मदत करत आहेत.