मुंबई : मुंबईतील जेव्हीएलआरवर ट्रकने पाच कार आणि बाईला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या अपघातात 30 वर्षीय युवकाला प्राण गमवावे लागले. आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार असून पोलिसांनी क्लीनरला अटक केली आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील सीप्झच्या गेट नंबर 3 चा सिग्नल लाल होता. सर्व गाड्या सिग्नल सुटण्याची वाट पाहत होत्या. पंकज थोरात हा तरुण आपल्या बाईकवर सर्वात पुढे थांबला होता. त्याचवेळी एक वाळूचा ट्रक भरधाव वेगाने आला.
उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ट्रक सगळ्या गाड्यांना उडवत पुढे आला. आजूबाजूच्या 5 गाड्यांना हा ट्रक सोबत घेऊन पुढे गेला. यातील एक गाडी समोर उभ्या असणाऱ्या पंकजच्या अंगावर गेली आणि तो गाडी खाली दबला गेला.
जवळपास 10 ते 15 मिनिटं पंकज गाडीखाली अडकला होता. ट्रकने दिलेली टक्कर इतकी भीषण होती, की दोन गाड्या जागेवरच फिरल्या होत्या. पादचाऱ्यांनी गाडी हटवून पंकजला जवळच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं, पण तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सीप्झच्या गेट नंबर 3 समोर वारंवार अशाप्रकारचे अपघात होत असल्याची तक्रार केली जाते. फ्लायओव्हरवर असणाऱ्या उतारामुळे गाड्यांचे ब्रेक काही वेळेला लागत नसल्याचं म्हटलं जातं. स्पीडब्रेकर बसवण्याच्या स्थानिकांच्या मागणीवर काही उत्तर निघालेलं दिसत नाही.