Uddhav Thackeray :  सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा आहे. पण राज्यात तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा कर्मचारी ताईंना त्यांना मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. आजही राज्यात अनेक बालक आहेत कुपोषणात आहेत. तर, दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय.हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे नाव न घेता केली. ज्योतीमध्ये शांतपणा पण असतो मात्र असंख्य ज्योति एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते.  तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. 


मागील महिनाभरापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आज, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आज, नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलोय. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.  क्रांतिज्योती, महात्मा लावावं अशी माणसंच आता उरली नाहीत.  ज्योती शांतपणा पण असतो मात्र असंख्य ज्योति एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते असे ठाकरे यांनी म्हटले. 


हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल?


तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत. क्रांती ज्योतिच्या ज्योती तुमच्यात तेवतात की नाही? असा प्रश्न करताना असंख्य ज्योती जेव्हा पेटतात तेंव्हा निर्माण होणारी मशाल सत्ता पालटून टाकते एवढी ताकद आहे असेही उद्धव यांनी म्हटले. अंगणवाडी, आशा सेविका, कर्मचारी गावागावात दोन जाऊन काम करतात. हेच काम करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल? असे सांगत उद्धव यांनी आगामी निवडणुकीत सरकार बदलण्याचे आवाहन केले. 


मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही. मग मी आंदोलनाला कसा येऊ  असा प्रश्न तुमच्या नेतृत्वाला केला होता. त्यावेळी त्यांनी तुम्ही मुख्यमंत्री असताना कोरोनाची महासाथ पसरली होती. त्याचा मुकाबला सगळे करत होते. अ


पुढच्या अधिवेशनात मंत्री म्हणून राहणार का?


उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, डिसेंबरपासून तुमचा लढा सुरू आहे. सरकार तुमचं काही ऐकत का? असा प्रश्न त्यांनी केला. आंदोलन पेटलं की मंत्री येतात. पुढच्या अधिवेशनात विषय मार्गी लावू असं म्हणतात. अरे पण तू पुढच्या अधिवेशनात मंत्री म्हणून राहशील का? तुझं सगळं दिल्लीतून चालतं अशी टीका उद्धव यांनी केली. सरकार पाडला नसत तर आज तुम्हाला आंदोलनाला यावं लागलं नसतं असेही त्यांनी म्हटले. भारत घडवणारी पिढी तुमच्याकडून घडते. यांना सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण तुम्हला मानधन द्यायला पैसे नाहीत असेही उद्धव यांनी म्हटले. 


कोरोना काळात तुमची मेहनत मोठी


कोरोनावर प्रभावीपणे काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझे नाव होते. मात्र, त्या नावामागे तुम्ही सर्वांनी केलेली मेहनत मोठी होती. कोरोना महासाथीच्या काळात तुम्ही अंगणवाडी सेविका-कर्मचारी घरोघरी जात होतात. सर्वे करणे, लोकांना भेटणे, औषधे देणे आदी कामे केली जात होती. तुम्ही केलेल्या कामांमुळे कोरोनात प्रभावी काम करणे शक्य झाले असल्याचे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. 


शिवसैनिकही साथ देतील...


आशा कर्मचारीदेखील तुमच्या लढ्यात उतरणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शिवसैनिकांना अंगणवाडी-आशा कर्मचारी-सेविका माता बहिणीसोबत उभे राहत या लढ्याला पाठिंबा देण्याची सूचना करत असल्याचेही उद्धव यांनी म्हटले.