मुंबई: एका आठवड्यात घसघशीत परताव्याचे आमिष दाखवून टोरेस या कंपनीने लाखो मुंबईकरांना गंडा घातल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. नववर्षाच्या सुरुवातीला उघड झालेल्या या घोटाळ्यात लाखो मुंबईकरांनी आपले पैसे गमावले आहेत. टोरेस ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीचे बनावट दागिने विकण्याचा व्यवसाय करत होती. रविवारी पैसे गुंतवल्यानंतर गुरुवार ते शुक्रवारपर्यंत गुंतवणुकदारांना झटपट पैसे परत दिले जायचे. टोरेस कंपनीने मुंबईत सहा अलिशान कार्यालये उघडली होती. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर असलेला कर्मचारी वर्ग आणि सेटअप पाहून बहुतांश गुंतवणुकदारांना टोरेस कंपनीच्या विश्वासर्हतेबद्दल खात्री पटली होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात टोरेस कंपनी आपल्या ग्राहकांना कशाप्रकारे भुलवत होती, याच्या अनेक सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. टोरेस कंपनीकडून आपल्या ग्राहकांना एक बनावट हिरा दिला जायचा. मोईसॅनाईट स्टोन नावाने ओळखला जाणाऱ्या या हिऱ्याची किंमत 200 ते 300 रुपये इतकी होती. मात्र, टोरेस कंपनी हा मोईसॅनाईट स्टोन सहा ते सात हजारांना विकत असे. ग्राहकांनी मोईसॅनाईट स्टोन खरेदी केल्यास त्यांना 9 टक्के रक्कम बोनस स्वरुपात दिली जात होती. याशिवाय, टोरेस कंपनीच्या सेमिनार्समध्ये ग्राहकांना भेटवस्तू, दागिने दिले जात असत. या सगळ्या दिखाव्याला भुलून अनेक ग्राहक टोरेस कंपनीत जास्तीत जास्त पैसे गुंतवत गेले आणि सर्वकाही गमावून बसले.
गेल्या काही दिवसांपासून टोरेस कंपनीकडून एक नवी ऑफर जाहीर करण्यात आली होती. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी होती. या कालावधीत गुंतवणूक करणाऱ्यांना कार, मोबाईल आणि 40 ते 60 टक्के इतका बोनस देण्याचे आमिष कंपनीकडून दाखवण्यात आले. त्यामुळे या काळात अनेक गुंतवणुकदारांनी बाहेरुन पैसे उधार घेऊन टोरेस कंपनीत गुंतवले आणि त्यांचा घात झाला.
टोरेस कंपनीच्या सर्वेश सुर्वेला पोलिसांनी डोंगरीतून उचलला
टोरेस कंपनीचा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वेश सुर्वे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सर्वेश सुर्वे हा टोरेस कंपनीत आधारकार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचे नाव, आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर करण्यात आला. त्याला महिन्याला 22 हजार रुपये पगार मिळत होता. मुंबई पोलिसांनी सर्वेश सुर्वे याला डोंगरीतील उमरखाडी परिसरातून ताब्यात घेतले होते.
टोरेस हा ज्वेलरी ब्रँड प्लॅटिनम हर्न प्रा. लिमिटेड ही कंपनी चालवत होती. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरारोड अशा सहा ठिकाणी टोरेस कंपनीच्या शाखा होत्या. या सहा शाखांमध्ये सुमारे सव्वालाख गुंतवणुकदारांनी हजारो कोटी रुपये गुंतवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आणखी वाचा