Mumbai to Belapur Water Taxi Inauguration : मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सीतून करता येणार आहे. देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन आज दुपारी 12 वाजता करण्यात आलं. मुंबई ते बेलापूर दरम्यानची ही जलवाहतूक गेले काही महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचं उद्गाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. या प्रकल्पावरून राजकारणही रंगलंय. या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असताना आणखी प्रतीक्षा का करायची? अशी भूमिका घेत आघाडी सरकारनं या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला. 


कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्राला प्राधान्य दिलं त्याबद्दल केंद्राचे धन्यवाद. समुद्राची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली आणि आरमार उभारलं. येत्या काही वर्षात समुद्राचं पाणी आपण पिण्यायोग्य करतोय." पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "राजकारण राजकारणाच्या जागी असतंच, मात्र लोकांची सेवा झाली पाहिजे. तसंही पंतप्रधान स्वत:ला पंत्रधान नाही तर प्रधानसेवक म्हणतात. 


बहुप्रतीक्षित मुंबई (Mumbai) ते बेलापूर (Belapur) वॉटर टॅक्सीचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन आज 17 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. 


बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटं तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचं भाडं प्रति प्रवासी 800 ते 1200 रुपये तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी 290 रुपये इतकं ठेवण्यात आलं आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.


मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे 8.37 कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचं बांधकाम करण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत 50 : 50 प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे आणि खाड्यांमधून दरवर्षी सुमारे 2 कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन आणि वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही असतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यांसारख्या वाहतूककोंडीची समस्या भेडसावणाऱ्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते आणि रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. 


वॉटर टॅक्सीचे दर काय? 


बेलापूर ते मुंबईत भाऊचा धक्का या जलमार्गावर वॉटर टॅक्सी सेवा आज सुरु होत आहे. तरी दरम्यान, वॉटर टॅक्सीच्या प्रवासाचं भाडं मात्र प्रवाशांचा खिसा रिकामा करणारं ठरणार आहे. कारण स्पीडबोटीतून प्रवासासाठी तब्बल 800 ते 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हे अंतर जरी अर्ध्या तासात गाठता येणार असलं तरी त्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजणं प्रवाशांच्या आवाक्याबाहेर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सेवा पांढरा हत्ती ठरण्याची भीतीही आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha