मुंबई : मालाड पूर्व (Malad) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट आणि आऊटलेटवरील झडपा बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर आणि शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी उपनगरातील मालाड पूर्व, गोरेगाव पूर्व आणि कांदिवली पूर्व परिसरामधील काही भागातील पाणीपुरवठा (Water Supply) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा का बंद राहणार ?
मुंबई महानगरपालिकेकडून मालाड पूर्व येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट आणि आऊटलेटवर असणारा झडपा हा जुना आणि खराब झाला आहे. त्यामुळे एकूण 10 जलद्वार बदलण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी हे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील काम हे 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यामध्ये 900 मिली मीटर व्यासाचे तीन आणि 750 मिली मीटर व्यासाचा एक असेच चार जलद्वारे म्हणजेच वॉल्व बदलण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील काम हे 13 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. त्यामध्ये 900 मिली मीटर व्यासाचे दोन आणि 750 मिली मीटर व्यासाचा एक असे एकूण तीन जलद्वार बदलण्यात येतील. त्यामुळे या कालावधीमध्ये या भागातील पाणीपुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पाण्याची योग्य साठवणूक करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?
मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर, पी दक्षिण आणि आर दक्षिण या विभागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये पी उत्तर अर्थातच मालाड पूर्व, पी दक्षिण म्हणजेच गोरेगाव पूर्व या भागातील पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दर आर दक्षिण म्हणजेच कांदिवली भागातील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा 1 आणि 2 आणि नर्सीपाडा परिसरातील पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहिल.
त्यामुळे या भागातील लोकांना पाणीपुरवठा खंडित होण्याच्या एक दिवस आधीच योग्य आणि मुबलक पाणीसाठा भरुन ठेवावा असं आवाहन केलं आहे. तर या भागामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहिल. तर पाणीकपातीच्या कालावधीमध्ये काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी योग्य सहकार्य करण्याची विनंती देखील यावेळी महानगरपालिका प्रशासनाने केलीये.
हेही वाचा :
Weather Update : पुढील 24 तास परतीच्या पावसाचा धुमाकूळ, हवामान खात्याने वर्तवला अंदाज